Maharashtra politics Supriya Sule about CM | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मी मुख्यमंत्री असते तर मला झोप लागली नसती : सुप्रिया सुळे

भारत नागणे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

शेतकरी आत्महत्या ही एक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. निसर्गाची अवकृपा आणि चुकीच्या सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातूनच आत्महत्यांची संख्या वाढू लागली आहे. यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत. गेल्या तीन वर्षामध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या आत्महत्यांमुळे मन सुन्न झाले आहे - सुप्रिया सुळे

पंढरपूर : गेल्या तीन वर्षामध्ये देशात व राज्यात शेतकऱ्यांच्या कधी नव्हेत इतक्‍या प्रचंड आत्महत्या झाल्या आहेत. याला सर्वस्वी सरकारची शेती विषयक धोरणे जबाबदार आहेत. आजही शेतीमालाला हमी भाव नाही. वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे. हे सर्व घडत असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कशी काय झोप लागते.? मी मुख्यमंत्री असते तर अशा परिस्थितीमध्ये मला झोप लागली नसती, अशी खंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपुरात बोलताना व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या युवक संवाद यात्रेच्या निमित्ताने खासदार सुळे यांनी आज येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील युवक व युवतींशी मुक्तसंवाद साधला. यावेळी त्यांनी हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, मुलींची सुरक्षितता या विषयी मुलींनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. संवाद कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारच्या चुकीच्या शेती धोरणाकडे लक्ष वेधले.

यावेळी खासदार सुळे म्हणाल्या, ''शेतकरी आत्महत्या ही एक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. निसर्गाची अवकृपा आणि चुकीच्या सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातूनच आत्महत्यांची संख्या वाढू लागली आहे. यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत. गेल्या तीन वर्षामध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या आत्महत्यांमुळे मन सुन्न झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आणि मानसिक आधार देण्याचे काम संवाद यात्रेच्या निमित्ताने सुरू आहे. देशातील वाढत्या माहागाईच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्यात सरकार विरोधी आंदोलन सुरू आहे. कर्ज माफी योजनेचा जास्तीत शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.'' एकूणच राज्यातील व केंद्रातील दोन्ही सरकारे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचेही यावेळी खासदार सुळे यांनी यावेळी सांगितले.

कोपर्डी खटल्याचा निकाल तीन महिन्यात लावा!
कोपर्डी अत्याचार खटल्याचा निकाल तीन महिन्यात लागावा अशी अपेक्षा आहे. परंतु तीन महिन्यात आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही तर, राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाची सुरवात ही समतेच्या आणि वारकऱ्यांच्या पंढरीतून केली जाणार आहे. यामध्ये राज्यातील कॉलेज युवती मोठ्या संख्येने सहभागी होतील असेही खासदार सुळे यांनी यावेळी जाहीर केले.

संबंधित लेख