Maharashtra politics : solapur Prashant Paricharak | Sarkarnama

सैनिक पत्नीचा अवमान करणाऱ्या प्रशांत परिचारकांचे निलंबन रद्द ;  कुणाला खेद ना खंत ! 

ब्रह्मा चट्टे  : सरकारनामा  
गुरुवार, 1 मार्च 2018

सैनिक पत्नीचा अवमान  करणाऱ्या निलंबित आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलबंन रद्द करण्याचा ठराव काल विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्या ठरावाला ना विधान परिषदेत बहुमत  असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध केला ना सत्तेला लाथ मारण्याच्या धमक्या देणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी.!

सैनिक पत्नीचा अवमान  करणाऱ्या निलंबित आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलबंन रद्द करण्याचा ठराव काल विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्या ठरावाला ना विधान परिषदेत बहुमत  असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध केला ना सत्तेला लाथ मारण्याच्या धमक्या देणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी.प्रत्यक्ष ठराव झटपट संमत झाला .गोंधळाचे कारण देत तो ठराव मंजूरही करण्यात आला. यात सगळ्या पक्षांचे आमदार सहभागी होते हे काय वेगळं सांगायला नकोच.  नाही म्हणायला आज शिवसेनेच्या १-२ आमदारांनी याबाबत आवाज उठवला पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली !

पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे पुढारी असणारे प्रशांत परिचारक सोलापूरजिल्हा दूधसंघाचे अध्यक्षपण आहेत. त्याच दूधाच्या मलाईवर 'पैलवान' झालेल्या प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीला सोडून  भाजपच्या कमळाला जवळ केले. यापुर्वी विधानसभेत शिरकाव करण्यासाठी त्यांनी 'स्वाभीमानी'  शेतकरी संघटनेतही शिरकाव केला होता. मात्र, कारखानदार असणाऱ्या प्रशांत परिचारकांशी राजू शेट्टींनी केलेली गट्टी मतदारांना पसंद पडली नव्हती. त्यानंतरच्या काळात स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ सोलापूर या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी करत प्रशांत परिचारक यांनी अपक्ष निवडणूक लढवली.

राष्ट्रवादीच्या 'दादा ' नेत्यांनी परिचारकांचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडले परंतू प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिपक साळूखे पाटील यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे विजयापेक्षा अधिकचे संख्याबळ होते. काँग्रेस पक्षानेही राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता. काँग्रेसचे दिग्जनेते सुशिलकुमारे शिंदेही सोलापूरमध्ये ठाण मांडून बसले होते.

पण परिचारकांच्या 'प्रसादा 'समोर कुणाचेच काही चालले नाही. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असताना देखील प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा  पराभव केला होता. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील पराभव हा राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. खुद्द माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र या निवडणुकीत भाजप पूरस्कृत प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा  पराभव केला होता.

त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूकीच्या काळात प्रचारा दरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांबाबत अपशब्द वापरले होते. याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळून आली होती. सोलापूर जिल्ह्यातील गावागावात खदखद होती. राज्यभरातील जनतेच्या भावना 'प्रशांत परिचारकांना फासावर लटकवा' अशाच होत्या. माजी सैनिकांच्या संघटनेने तर परिचारकांच्या घरासमोर निदर्शने केली होती. जागोजागी परिचारकांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. ठिक ठिकाणी रस्ता रोकोही करण्यात आले होते. सोशल मीडिया परिचारकांच्या निषेधाने भरून गेला होता. 

त्यामुळे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय आधिवेशात काँग्रेस राष्ट्रावादीसह शिवसेनेनेही परिचारकांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभा व विधान परिषदेचे कामाकाज बंद पाडले होते. त्यामुळे जनतेच्या भावनांची दखल घेत बहूमतांने परिचारक यांना दीड वर्षासाठी विधानपरिषद सभागृहातून निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान, त्यांचा एक वर्षाचा निलंबनाचा कालावधी पूर्ण झाला आहे. जनताही बऱ्यापैकी परिचारकांना विसरून गेली आहे. त्यामुळे अवघे सहा महिने निलंबनाचा काळ शिल्लक उरला होता. आता तोही सर्व पक्षांना विश्वासात घेऊन माफ करण्यात  आला आहे असे दिसते . सध्या विधान परिषदेचे सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. प्रशांत परिचारक हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे.

मात्र  सध्या ते आपण  मुख्यमंत्र्यांचे खास आहोत असे भासवीत  सगळीकडे फिरत असतात. त्यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. पण त्यांनी  सैनिकांच्या पत्नींचा अपमान केलाय हे विसरून चालणार नाही . शेवटी देशभरातील सैनिकांच्या पत्नींचा आक्रोश हवेतच विरलाय. सगळे आमदार झालं गेलं विसरून आपल्या दुनियेत  रमले आहेत. त्यामुळे सैनिकद्रोही  प्रशांत परिचारकांचे  निलंबन रद्द झाल्याचे ना कुणाला खेद आहे ना कुणाला खंत आहे !

संबंधित लेख