Maharashtra Politics Pankaja May come to Bhagwangad | Sarkarnama

पंकजा गडावर येणार, पण मेळाव्याबाबत प्रश्नचिन्ह

मुरलीधर कराळे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

भगवान गडावरील दसरा मेळाव्याबाबत मागील वर्षी मारामाऱ्या झाल्या. महंत डाॅ. नामदेव शास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैचारिक मतभेदामुळे सर्वसामान्यांची डोकी फुटली. या वर्षी हे टाळण्यासाठी गडावर व पायथ्यालाही मेळावाच नको, अशी भूमिका आता गडाच्या पायथ्याजवळील गावांनी घेतली आहे.

नगर : भगवान गडावरील दसरा मेळाव्याबाबत मागील वर्षी मारामाऱ्या झाल्या. महंत डाॅ. नामदेव शास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैचारिक मतभेदामुळे सर्वसामान्यांची डोकी फुटली. या वर्षी हे टाळण्यासाठी गडावर व पायथ्यालाही मेळावाच नको, अशी भूमिका आता गडाच्या पायथ्याजवळील गावांनी घेतली आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे गडावर येतील. भगवानबाबांचे दर्शन घेतील, असे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी जाहीर केल्याने पंकजा मुंडे तर येणार, पण मेळावा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मागील आठ दिवसांपूर्वी मेळावा घेण्याबाबत कार्यकर्त्यांनी जोरदार हालचाली केल्या. तशी तयारीही करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह गडावरच मेळावा घेण्याबाबत होता, तथापि, मुंडे यांनी मेळाव्याला येण्याबाबतची भूमिका जाहीर केली नसल्याने कार्यकर्तेही हतबल झाले आहेत. दुसरीकडे महंतांना मानणारे कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. दसरा जवळ येत असताना मेळाव्याला विरोध वाढू लागल्याने प्रशासनाचीही कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत मेळाव्याला परवानगी मिळण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून परवानगीची शक्यता धूसर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मेळाव्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता धूसर आहे. कारण (कै.) गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या म्हणून पंकजाला समाजाने कौल दिला असला, तरी भाजपच्या गोटातून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. वंजारी समाजाची मते मिळण्यासाठी पंकजा मुंडे यांचा चेहरा भाजपने वापरला असला, तरी तो किती काळ टिकू द्यायचा, याविषयी वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मेळाव्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना असताना त्यांनी हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकून स्वतः नामानिराळे राहिले. त्याचा अर्थच मेळाव्याला विरोध करणे असा होतो, हे जनतेने समजून घेतले.

त्यामुळे पालकमंत्री ते थेट मुख्यमंत्री अशा साखळीत मेळाव्याला परवानगी मिळण्याची शक्यता धुसर आहे. दसरा चार दिवसांवर येऊन ठेपला असताना स्थानिक ग्रामस्थांचा विरोध वाढल्याने प्रशासनाला मेळाव्याच्या विरोधात कागद रंगवायला रान मोकले झाले आहे.

विरोधासाठी प्रशासनाला निवेदने पुरेशी
भगवान गडाच्या पायथ्यालगतच्या खरवंडी, मालेवाडी, ढाकणवाडी, काटेवाडी, मिडसांगवी, भारजवाडी, कीर्तनवाडी आदी गावांतील सुमारे दीडशे ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देऊन मेळावा घेऊ नये, अशी विनंती केली. त्यावर पाचशे ग्रामस्थांनी सह्या आहेत. ढाकणवाडीचे सरपंच बाबूराव ढाकणे, ऊसतोडणी कामगार संघटनेचे सदस्य आश्रू कराड अशा अनेक गावांतील पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम-कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनीही गडावरील मेळाव्याला विरोध दर्शविनारे निवेदन दिले. पाथर्डी तहसील कार्यालयातही अशा पद्धतीचे निवेदन देऊन त्यावरही हजारो ग्रामस्थांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. प्रशासन पातळीवर मेळाव्याच्या विरोधाबाबतच्या निवेदनांची यादी वाढत असल्याने मेळावा रद्द करण्यासाठी प्रशासनाला पुरक कागदपत्रे पुरेशी होणार आहेत.

रिपब्लिन, भाजपची पुन्हा निवेदने
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र आरोळे, इंद्रजित शिंदे तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी पुन्हा तहसीलदारांची भेट घेऊन मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचीच परंपरा पंकजा चालवित असल्याने मेळाव्याला परवानगी मिळावी, असे त्यांनी म्हटले आहे. असे असले, तरी पंकजा मुंडे यांचीच भूमिका स्पष्ट नसल्याने कार्यकर्तेही शांत झाले आहेत.

मेळाव्याबाबत जानकरांचे कानावर हात
भगवानबाबांचा मी भक्त आहे. समस्त बहुजन समाजाचे ते श्रद्धास्थान आहे. पंकजा मुंडे माझी बहिण आहे. त्यामुळे मी बहिणीसोबत गडावर जाणार आहोत, असे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनानिमित्त ते नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मात्र, मेळावा होईल की नाही, याबाबत त्यांनी कानावर हात ठेवले.

संबंधित लेख