Maharashtra politics :Nitin Gadkari Meets Jaydatta Kshirsagar | Sarkarnama

गडकरी-क्षीरसागर भेटीत चर्चा महामार्गाची की  नव्या 'राजमार्गाची' 

दत्ता देशमुख : सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 1 मार्च 2018

दिवंगत माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांचे राजकीय वारसदार जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बडे प्रस्थ. पण, पक्षातील एका गटाकडून नेहमीच होणाऱ्या कुरघोड्यांमुळे ते सध्या पक्षावर नाराज आहेत. गुरुवारी त्यांनी मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. 

बीड  : दिवंगत माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांचे राजकीय वारसदार जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बडे प्रस्थ. पण, पक्षातील एका गटाकडून नेहमीच होणाऱ्या कुरघोड्यांमुळे ते सध्या पक्षावर नाराज आहेत. गुरुवारी त्यांनी मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. 

सोशल मिडियावर याचे फोटो पडताच त्यांच्या समर्थकांनी ते केवळ महामार्गाच्या चर्चेसाठी गेले होते अशी सावरासावर सुरू केली आहे. परंतु जिल्ह्यातील सद्य राजकीय परिस्थिती आणि पक्षाकडून सातत्याने डावलले जात असतांना जयदत्त क्षीरसागर यांनी घेतलेली गडकरी यांची ही भेट नव्या राजकीय मार्गाची नांदी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

पंचायत समिती सदस्यापदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे जयदत्त क्षीरसागर यांनी उपमंत्री, राज्यमंत्री, कॅबीनेट मंत्री असा चढता राजकीय प्रवास केला. सध्याही ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आहेत. संस्थांचे जाळे आणि जिल्हाभर कार्यकर्त्यांचा संच अशा अनेक राजकीय जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत. 

पण, अलिकडे जिल्ह्यातील पक्षाचा एक गट त्यांच्यावर राजकीय कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाही. विशेष म्हणजे या गटाला पक्षातील वरिष्ठ पातळीवरील एक गटही बळ पुरवतो आणि हा गट त्यांच्या पुतण्यालाही अधुन- मधून राजकीय हवा देत असतो. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनात शरद पवारांच्या रांगेत दिसणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना बीड या होमपिचवरील अजित पवारांच्या  कार्यक्रमापासूनच दुर ठेवले जातेअशी त्यांच्या समर्थकांची तक्रार आहे . या आणि अशा अनेक गोष्टीं  होत असल्याने क्षीरसागरांच्या नाराजीत वरचेवर अधिकच भरत पडत आहे. 

त्यामुळे अधून-मधून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चाही ऐकायला मिळतात. दोन महिन्यांपूर्वी पक्षातील कुरघोड्यांना कंटाळलेल्या क्षीरसागरांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घरी चहापानाला बोलावले. त्यांची ही खेळी पक्षाला भारी पडली आणि 'नाक दाबले तरच तोंड उघडते' या म्हणीप्रमाणे कायम गप्प असणाऱ्या पक्षाच्या प्रवक्‍त्यांना देखील प्रतिक्रिया द्यावी लागली. 

मुंबईतील भेटीने चेर्चेला उधाण 

गुरुवारीही क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. बीडमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि महामार्गावर असलेल्या बिंदुसरा नदीवरील बहुचर्चित पुलाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. तसे, महामार्गाच्या कामांबाबत नेहमी सहकार्य देणारे नितीन गडकरी राजकीय मुत्सदीही आहेत. त्यांच्या नजरेतून क्षीरसारांची पक्षासाठीची उपयुक्तता निश्‍चितच सुटली नसणार. 

कारण, विदर्भाच्या एका पट्ट्यात तौलिक समाजाची संख्या निर्णायक असून श्री. क्षीरसागर या समाज सभेचे अध्यक्ष आहेत. तसेच, ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांची राज्यभरात ओळख आहे. आजघडीला भाजपापेक्षा क्षीरसागरांना चांगल्या राजमार्गाची गरज असली तरी भविष्यासाठी पक्षालाही उत्तम राजकीय वाहनचालकाची गरज राहणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये राष्ट्रीय महामार्गाबरोबरच 'राजमार्गा'चीही चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

संबंधित लेख