Maharashtra Politics NCP Morcha Ajit Pawar | Sarkarnama

मोर्चाच्या निमित्ताने ताकद आजमावण्याचा अजितदादांचा प्रयत्न?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या शनिवारी (ता. 7) पिंपरीत महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजिला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता या मोर्चाच्या निमित्ताने पक्षाची एकेकाळच्या बालेकिल्ल्यात किती ताकद राहिली आहे, हे आजमावण्याचा अजित पवार यांचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

पिंपरी : महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या शनिवारी (ता. 7) पिंपरीत महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या मोर्चात सहभागी होणार असल्याने, पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोर्च्याची तयारी करण्यासाठी प्रभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मोर्चाचे निमित्त साधत पक्षसंघटना पुन्हा सक्रीय करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता या मोर्चाच्या निमित्ताने पक्षाची एकेकाळच्या बालेकिल्ल्यात किती ताकद राहिली आहे, हे आजमावण्याचा अजित पवार यांचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याच्या शक्‍यता असून, त्याच्या तयारीला लागण्याचा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पक्षातील नेत्यांना दिली. पक्षाने एक ऑक्‍टोबरपासून सात ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी महागाईविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच भाग म्हणून पिंपरीत मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चाचा प्रारंभ काळेवाडीतील पंचपीर चौकातून शनिवारी दुपारी तीन वाजता होईल. पिंपरी कॅम्प, डीलक्‍स चौक, पिंपरी बाजारपेठ, भाटनगर यामार्गे आंबेडकर चौकात मोर्चाचा समारोप होईल, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मंगळवारी दिली. महागाईने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या शहर कार्यकारिणीची, तसेच नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेऊन मोर्चाची तयारी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पक्षाच्या प्रभाग स्तरीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली, तसेच माजी नगरसेवकांची बैठक बुधवारी घेण्यात येणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.

संबंधित लेख