Maharashtra Politics Nagpur Sunil Kedar | Sarkarnama

केदारांनी मागितला अशोक चव्हाणांचा राजीनामा

सुरेश भुसारी
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

काही दिवसांपूर्वी नागपुरातील काही नेत्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना हटविण्याची मागणी केली होती. चव्हाण यांच्या नेतृत्वात विदर्भातील काँग्रेस संघटन खिळखिळे होत असल्याचा आरोप केला होता. आमदार केदार यांच्या या नव्या मागणीने काँग्रेसमधील दुफळी पुन्हा समोर आली आहे.

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीपासून नागपूर शहर काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पडली आहे.

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी-नितीन राऊत यांच्यातील वाद मिटलेला नाही. नागपूर शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे हे मुत्तेमवार गटाचे समर्थक आहेत. विरोधी पक्षनेतेपदावरून सुरू झालेला वाद न्यायालयात पोहोचला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुत्तेमवार गटाला पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर चतुर्वेदी गटाच्या 17 नगरसेवकांना पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आरोप लावून कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

उच्च न्यायालयाने चतुर्वेदी गटाचा दावा योग्य ठरविल्याने प्रदेशाध्यक्ष चव्हाण व मुत्तेमवार गटाची बाजू लंगडी पडली आहे. या वादाशी नागपूर ग्रामीण भागातून निवडून आलेल्या आमदार सुनील केदार (सावनेर) यांचा संबंध येत नाही. आमदार केदार हे चतुर्वेदी गटाचे समर्थक मानले जातात. आमदार केदार यांच्या समर्थक नगरसेवकांनी चतुर्वेदी गटाला पाठिंबा दिला आहे. न्यायालयाने चतुर्वेदी गटाची बाजू उचलून धरल्याने आता प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुनील केदार यांनी केली आहे.

संबंधित लेख