Maharashtra Politics Dhananjay Munde | Sarkarnama

आदिवासी विभागातील ठेकेदाराला वाचविण्यासाठी जेष्ठ मंत्री प्रयत्नशील : धनंजय मुंडे यांचा आरोप

गोविंद तुपे
शनिवार, 29 जुलै 2017

गतीमान आणि पारदर्शी सरकारमध्ये अशा लुटारू ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी भाजपचे वरिष्ठ मंत्री प्रयत्न करीत आहेत- धनंजय मुंडे

मुंबई : मोटार प्रशिक्षणाच्या नावाने बोगस लाभार्थी दाखवून आदिवासी विभागाचा लाखो रूपयांचा निधी लाटण्यात आला आहे. विधान परिषदेत वारंवार मागणी करून देखील आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी ठेकेदारांचे नाव आपल्या उत्तरात जाहीर केलेले नाही, उलट रमेश मोटार ट्रेनिंग स्कूलला पाठीशी घाला असे आदेशच एका वजनदार मंत्र्यांनी दिले आहेत असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

'रमेश मोटार ट्रेनिग स्कूल या संस्थेने आदिवासी भागातील मुलांना मोटार प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली बोगस लाभार्थी दाखवून निधी हडप केला आहे. यापुर्वीही रमेश मोटार ट्रेनिंग स्कूलने असाच प्रकार करून सामाजिक न्याय विभागात 145 कोटी रूपयांचा अपहार केल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला होता. त्याचीच पुनरावृत्ती आदिवासी विभागात होत आहे. पण गतीमान आणि पारदर्शी सरकारमध्ये अशा लुटारू ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी भाजपचे वरिष्ठ मंत्री प्रयत्न करीत आहेत,' असा मुंडे यांचा आरोप आहे.

तसेच सभागृत याविषयाबाबत आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना रमेश मोटार ट्रेनिग स्कूलचा उल्लेख टाळण्याच्या सूचना आदिवासी मंत्र्याना देण्यात आल्या असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. विशेष म्हणजे या प्रकरणात जळगावमधील भाजपाचे दोन जेष्ठ नेते आमने-सामने आले आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या पारड्यात वजन टाकणाऱ्या नेत्याची सरशी होते आहे का, विरोध करणाऱ्या नेत्यांची? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

संबंधित लेख