Maharashtra Politican News Bhagwangadh Munde Shastri | Sarkarnama

भगवान गडासाठी आता रक्त सांडण्याची भाषा

मुरलीधर कराळे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

भगवान गडाचा वाद आता टोकाला पोचण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी गडाचे महंत डाॅ. नामदेव शास्त्री सानप व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील असलेल्या या वादाला आता दोन्ही बाजुंनी अनेक गावांनी समर्थन दिले आहे. मुंडे समर्थक पाथर्डी, शेवगाव तालुक्यांबरोबरच इतर जिल्ह्यातूनही प्रशासनाकडे निवेदने देऊ लागले आहेत. मेळावा घेणारच, यावर ही गावे ठाम आहेत. विशेषतः बहुजन समाज एकत्रित येऊन पंकजा मुंडे यांना समर्थन देऊ लागला आहे.

नगर : भगवान गडावर मेळावा घ्यावा, अशी मागणी करीत शेवगाव तालुक्यातील बारा गावांनी आग्रह धरला, तर गडाच्या पायथ्यालगतच्या पंधरा गावांतील लोकांनी मेळाव्याला विरोध दर्शविला आहे. प्रसंगी रक्त सांडले, तरी चालेल, पण मेळावा होऊ देणार नाही, अशी भाषा महंतांना पाठिंबा दर्शविणाऱ्यांची सुरू झाली आहे. महंतही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

भगवान गडाचा वाद आता टोकाला पोचण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी गडाचे महंत डाॅ. नामदेव शास्त्री सानप व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील असलेल्या या वादाला आता दोन्ही बाजुंनी अनेक गावांनी समर्थन दिले आहे. मुंडे समर्थक पाथर्डी, शेवगाव तालुक्यांबरोबरच इतर जिल्ह्यातूनही प्रशासनाकडे निवेदने देऊ लागले आहेत. मेळावा घेणारच, यावर ही गावे ठाम आहेत. विशेषतः बहुजन समाज एकत्रित येऊन पंकजा मुंडे यांना समर्थन देऊ लागला आहे.

याबाबत शेवगाव तालुक्यातील बारा गावांचा मेळावा भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्यामध्ये राणेगाव, कानोशी, शिंगोरी, पिंगेवाडी, प्रभुवाडगाव, खडकेमडके, वडुले खुर्द, निंबेनांदूर, सामनगाव, जोहरापूर, ठाकूर पिंपळगाव, सोनेगाव सांगवी आदी गावांचा समावेश आहे. या गावांतील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मेळाव्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

या पदाधिकाऱ्यांच्या मते मेळावा राजकारणविहरीत व पक्षविरहित असतो. त्यात सर्वपक्षीय सहभागी होतात. या मेळाव्यानिमित्ताने महाराष्ट्रातील बहुजन समाज एकत्रित येत असतो. ही परंपरा खंडीत होऊ नये. मेळावा कोणत्याही परिस्थितीत घेणारच, यावर ही गावे ठाम आहेत. त्यांच्या समर्थनार्थ अनेक गावे एकत्रित येत आहेत.

भगवान गडाच्या मानसकन्या असलेल्या पंकजा मुंडे यांना महंतांनी आदरपूर्वक निमंत्रण द्यावे, मेळाव्याचा वाद संपण्यासाठी मेळावा गडावरच घ्यावा, अशी मागणी करीत पाथर्डी तालुका बहुजन समाजकृती समितीचे अध्यक्ष अॅड. सतिश पालवे यांनी आत्मक्लेष उपोषण सुरू करण्याचा प्रयत्न केला, तथापि, स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना रोखल्याने आंदोलन होऊ शकले नाही.

केवळ कीर्तनकारांचाच आवाज घुमेल
दुसऱ्या बाजुला महंत डाॅ. सानप यांनी मात्र गडावर केवळ कीर्तनकारांचाच आवाज घुमेल. ज्यांना राजकारण करायचे असेल, त्यांनी गड सोडून काहीही करावे, असा पवित्रा घेतला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गडाच्या पायथ्यालगतची सुमारे पंधरा गावे एकत्र आली. खरवंडी, मालेवाडी, एकनाथ वाडी, मिडसांगवी, भारजवाडी, ढाकणवाडी, कीर्तनवाडी (ता. पाथर्डी), शिंगोरी, राणेगाव, गोरेगाव, (ता. शेवगाव), पारगाव (जि. बीड) तसेच इतर सुमारे पंधरा गावांतील कार्यकर्त्यांनी महंतांना पाठिंबा दर्शविला. या गडासाठी आमच्या पुर्वजांनी डोक्यावर दगड आणले आहेत. काबाड कष्ट करून मिळविलेला पैसा गडाच्या विकासासाठी उभा केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांची मेहनत वाया जाऊ देणार नाही. गडाच्या रक्षणासाठी रक्त सांडले तरी चालेल, असा निर्धार या गावांतील ग्रामस्थांनी व्यक्त केला.

महंतांना ही भाषा शोभत नाही : मुंडे
गडावर रक्त सांडण्याची भाषा तेथील कार्यकर्त्यांच्या तोंडून महाराजांचीच आहे. अशा पद्धतीने महंतांनी लोकांना चिथावणी देऊ नये. महंतांना माणणारे पंधरा गावे नसून पंधरा कार्यकर्ते आहेत. गडावर येणाऱ्या सोळा लाख भाविकांना हे विरोध करीत आहेत. गडावर वाद होऊ नये. महाराज परंपरेला हे शोभत नाही, अशी प्रतिक्रीया भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

 

संबंधित लेख