Maharashtra Political News Solapur BJP | Sarkarnama

सोलापूर भाजप : दोघांचे भांडण तिसऱ्याचे नुकसान

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई व मानधन, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ करण्याची घोषणा सहकारमंत्री समर्थक महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्वातंत्र्यदिनी केली. त्यानुसार प्रशासनाने परिपत्रक काढून कार्यवाहीही सुरु केली. दरम्यान हा विषय माहितीस्तव स्थायी समितीकडे आला. त्यावेळी पालकमंत्री समर्थक सभापती संजय कोळी यांनी या परिपत्रकास स्थगिती दिली आणि 'आर्थिक अडचणी'चे कारण देत, चर्चेनंतर कार्यवाही करावी, असा ठराव स्थायी समितीच्या सभेत करून घेतला.

सोलापूर : 'दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' या म्हणीला छेद देत 'दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे नुकसान' ही नवीन म्हण प्रचलित करण्याचा प्रकार सोलापूर महापालिकेत झाला आहे. पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या समर्थकांतील गटबाजीमुळे महागाई भत्ता देण्याची कार्यवाही प्रशासनाला थांबवावी लागली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, भाजपने खरोखरच 'गाजर' दाखवायला सुरवात केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ कर्मचारी संघ'टना आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई व मानधन, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ करण्याची घोषणा सहकारमंत्री समर्थक महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्वातंत्र्यदिनी केली. त्यानुसार प्रशासनाने परिपत्रक काढून कार्यवाहीही सुरु केली. दरम्यान हा विषय माहितीस्तव स्थायी समितीकडे आला. त्यावेळी पालकमंत्री समर्थक सभापती संजय कोळी यांनी या परिपत्रकास स्थगिती दिली आणि 'आर्थिक अडचणी'चे कारण देत, चर्चेनंतर कार्यवाही करावी, असा ठराव स्थायी समितीच्या सभेत करून घेतला.

त्यामुळे प्रशासनाने नाईलाजाने पूर्वीचे परिपत्रक रद्द केले असून, या संदर्भात नव्याने परिपत्रक काढण्यात येईल, असे सुधारीत आदेश काढले आहेत. महागाई लागू करण्यासंदर्भातील निर्णय रद्द करण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिली वेळ आहे. भाजप मंत्र्यांच्या गटबाजीमुळे हा फटका बसल्याचे सांगत, नगरसेवकांचे मानधन वाढविण्यास एकमताने मंजूर करताना परिपत्रक थांबविणाऱ्या सभापतींना पालिकेची आर्थिक स्थिती दिसली नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सोलापूरला दोन मंत्रिपद मिळाली आहेत. त्याचा उपयोग विकासासाठी करण्याऐवजी गटबाजी वाढविण्यासाठी होत आहे. दोन्ही मंत्र्यांच्या समर्थकांच्या भांडणात अनेक विकास कामांचे प्रस्ताव रखडले आहेत. त्याची झळ आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही बसली आहे.

संबंधित लेख