Maharashtra Political News Sharad Pawar Diating | Sarkarnama

शरद पवारांच्या उपस्थितीत अविनाश मोहितेंच्या घरी रंगली डाएटिंग, मोबाईलची चर्चा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

रेठरे बुद्रुक येथील राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी जेवणाच्या टेबलावर नेत्यांमध्ये चर्चा रंगली ती डायटींग अन् अत्याधुमिक मोबाईलच्या वापराची. त्या चर्चेत ज्येष्ठ नेते खासदार  शरद पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, विधान परिषेदेचे सभापती रामराजे नाईक-निंबळकर यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी सहभागी झाली होती.

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक येथील राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी जेवणाच्या टेबलावर नेत्यांमध्ये चर्चा रंगली ती डायटींग अन् अत्याधुमिक मोबाईलच्या वापराची. त्या चर्चेत ज्येष्ठ नेते खासदार  शरद पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, विधान परिषेदेचे सभापती रामराजे नाईक-निंबळकर यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी सहभागी झाली होती.

ज्येष्ठ नेते पवार यांचा घरगुती सत्कार, पाहुणचार अविनाश मोहिते यांच्या कुटुंबियांशी औपचारिक चर्चा असा कार्यक्रम रेठरे बुद्रूक येथे  झाला. यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, जनता उद्योग समुहाचे प्रमुख राजेश पाटील वाठारकर, आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील-उंडाळकर उपस्थित होते. यावेळी मोहिते कुटुंबियांसमवेत पवार यांनी विविध विषयावर चर्चा केली. सर्वच नेत्यांनी न्याहरी झाल्यानंतर फोटो सेशन केले.  

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाहुणचारासह त्यांच्या घरगुती स्वागताचा अविनाश मोहिते यांनी आयोजित केलेला कार्यक्रम तसा औपचारिकच होता. मात्र, त्यालाही सातारा, सांगली जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे वेगळे स्वरूप प्राप्त झाले. साडेचारच्या सुमारास माजी मंत्री जयंत पाटील यांचे आगमन झाले. त्यांनी मोहिते यांची भेट घेवून कार्यक्रमाची चौकशी केली. त्यानंतर अवघ्या सातच मिनीटात ज्येष्ठ नेते पवार यांचे आगमन झाले. त्यांनी मोहिते यांच्यासह त्या भागातील राष्ट्रावादीच्या जुन्या लोकांशी चर्चा केली.

मोहिते यांच्या घरच्या हॉलमध्ये दहा मिनिटे हास्यकल्लोळात चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या न्याहरीसाठी डायनिंग टेबलाजवळ सर्वजण बसले. सफरचंद, संत्री, मोसंबी तसेच समोसा, पोहे, मिठाई होती. पण मी अवेळी जास्त खात नाही, असे म्हणत पवार यांनी स्वतंत्र डिश मागवून घेतली. तसेच पोह्यांचा स्वाद घेतला. कलिंगड ज्यूसही घेतला.

यावेळी नेते मंडळीत गप्पा रंगल्या, त्या डाएटिंगवरच. वजन वाढते त्यामुळे मी जास्त खात नाही, असे काही नेते सांगत होते.  त्यानंतर आमदार पाटील यांनीही त्यांच्या डाएटिंगचा फंडा सांगितला. माजी मंत्री जयंत पाटील व जनता उद्योग समुहाचे राजेश पाटील-वाठाकरकर यांनीही व्यायामाला महत्व दिले पाहिजे, म्हणत डाएटींगवर चर्चा केली. वाठाकर यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हेही डायटिंग करत असल्याचे सांगितले. यावर पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.

आमदार मकरंद पाटील यांनी मात्र आपण डाएट करत नाही असे सांगितले. त्यानंतर चर्चा रंगली ती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अत्याधुनिक मोबाईलची. पवार यांनी काही महत्वाच्या टीप सांगितल्या. मोबाईल वरच्या खिशात ठेवू नका, गंभीर असते, असा सल्ला त्यांनी नाईक-निंबळकर यांना दिला. त्यावेळी माजी मंत्री पाटील यांनी सगळ्यात अॅडव्हान्स मोबाईल साहेबांकडे असतात, अशी माहिती पवार यांना दिली.  त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये आले.

येथे पवार यांचा मोहिते कुटूंबियांतर्फे सत्कार झाला. नेत्यांसमवेत फोटो सेशन झाले. यावेळी अविनाश मोहिते यांच्याशी चर्चा करून पवार निघाले. जाताना पवार अविनाश मोहिते यांच्या मातुश्री सौ नूतन व वडील जगन्नाथ मोहिते यांना 'सगळे ठिक आहे, काळजी करू नका,' असे सांगून बाहेर पडले. कारमध्ये बसताना 'अच्छा अविनाश चलतो..' असे म्हणत त्यांच्या पाठीवर थाप टाकली. ज्येष्ठ नेते पवार यांनी अविनाश मोहिते यांच्या घरच्यासाठी दिलेला खास वेळ बरेच काही सांगून गेला.

 

संबंधित लेख