Maharashtra Political News PCMC Yogesh Bahal | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

विकासकामे आमची, नांवे बदलून श्रेय घेणार भाजप : योगेश बहल

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पालिका सभागृहाचे कामकाज नियमांप्रमाणे चालत नाही. ते सभाशास्त्राच्या नियमानुसार आणि लोकशाही पद्धतीने चालू ठेवणे गरजेचे आहे. परंतु सभागृहात बोलू दिले जात नाही. नवोदित नगरसेवकांनाही अंधारात ठेवून कामकाज केले जात आहे. सभागृहात अधिकार नसलेले काही लोक आमचे माईक बंद करण्याचा आदेश देतात. माईक बंद करतात ही बाब चुकीची आहे - योगेश बहल

पिंपरी : ''राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेल्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. स्वत: विकास कामे करावीत आणि नावे बदलावित. दुसऱ्याने केलेल्या विकासकामांचे नाव बदलण्याचा सत्ताधाऱ्यांना कोणी अधिकार दिला आहे. नाव बदलण्याचा घाट म्हणजे सूडाचे राजकारण आहे,'' अशी टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली आहे. तसेच भाजपचे पदाधिकारी स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या नावाखाली अनागोंदी व हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत, असाही आरोप बहल यांनी केला आहे.
 
पालिका मुख्यालयात योगेश बहल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर जुन्या प्रकल्पाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात आहे. संभाजीनगर, शाहूनगर परिसरातील सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव क्षेत्रीय सभेत ठेवला आहे. भाजपाची सत्ता येऊन सहा महिने झाले. पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराचा अनुभव आपण घेत आहोत. केवळ ठेकेदारांकडून वसुली सुरू आहे. मनमानी आणि हुकूमशाहीपद्धतीने काम सुरू आहे. टक्केवारीचे राजकारण सुरू आहे.''

''गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने या शहराचा कायापालट केला. मात्र, जुन्याच प्रकल्पांची पुन्हा उद्‌घाटने गैरपद्धतीने केली जात आहेत. श्रेय लाटले जात आहे. संत तुकारामनगर परिसरात काम करीत असताना भाजपाचे वसंत शेवडे यांनी नगरसेवक असताना विकास कामे केली. त्यावेळी दीनदयाळ उपाध्याय शाळा, बी. डी. किल्लेदार उद्यान, जनरल अरुणकुमार वैद्य अग्निशामक दल अशी विविध प्रकल्पांना नावे दिली. या भागाचे नेतृत्व आपण गेली पंचवीस वर्षे करीत असताना कधी विरोधकांनी तयार केलेल्या प्रकल्पांची नावे बदललेली नाही. सुडाचे राजकारण करायचे असते तर मी करू शकलो असतो. पालिकेतील सर्व महत्वाच्या पदावर मी होतो. परंतु, आम्हाला सुडाचे राजकारण करायचे नाही. दुस-याच्या कामाचे श्रेय घेणे योग्य नाही,'' असेही बहल म्हणाले.

''पालिका सभागृहाचे कामकाज नियमांप्रमाणे चालत नाही. ते सभाशास्त्राच्या नियमानुसार आणि लोकशाही पद्धतीने चालू ठेवणे गरजेचे आहे. परंतु सभागृहात बोलू दिले जात नाही. नवोदित नगरसेवकांनाही अंधारात ठेवून कामकाज केले जात आहे. सभागृहात अधिकार नसलेले काही लोक आमचे माईक बंद करण्याचा आदेश देतात. माईक बंद करतात ही बाब चुकीची आहे,'' अशी टीकाही बहल यांनी केली.

महापालिका सभागृहाचे कामकाज हे सभाशास्त्राप्रमाणे, नियमानुसार व लोकशाही पद्धतीने चालवावे. त्याचप्रमाणे पक्षाच्या ना भय ना भ्रष्टाचार, स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभार या नाऱ्याप्रमाणे कामकाज करावे, अशा मागण्यांचे पत्र विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी महापौर नितीन काळजे यांना दिले आहे.

संबंधित लेख