Maharashtra Political News Parbhani Shivsena | Sarkarnama

परभणीच्या खासदार-आमदार वादावर 'मातोश्री'वर पडदा

गणेश पांडे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. छोट्या-मोठ्या कारणातून दोघांची तोंडे दोन दिशेला झाल्याने  कार्यकर्ते सैरभैर झाले होते. खासदार व आमदारांतील हा वाद श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीतून प्रकर्षाने जाणवला. नव्हे यांच्या वादाचा येथे मोठा आगडोंब उडाला.

परभणी :  खासदार संजय जाधव व आमदार राहूल पाटील यांच्यात मागील काही महिन्यांपासुन सुरू असलेले मतभेद शुक्रवारी (ता.सात) 'मातोश्री'वर मिटले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उपस्थितीत मतभेद दूर करीत यापुढे असे होणार नाही, असा दोघांकडून शब्द घेतल्याचेही समजते.

खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. छोट्या-मोठ्या कारणातून दोघांची तोंडे दोन दिशेला झाल्याने  कार्यकर्ते सैरभैर झाले होते. खासदार व आमदारांतील हा वाद श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीतून प्रकर्षाने जाणवला. नव्हे यांच्या वादाचा येथे मोठा आगडोंब उडाला. विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांच्या स्वागतासाठी शिवाजीचौकात उभारलेल्या शिवसेनेच्या व्यासपीठावर खासदार व आमदारांत हमरी-तुमरी झाली. दोन्हीही नेते समोरासमोर आल्याने काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. दोन्ही नेत्यात शाब्दीक खडाजंगी होत असल्याचे पाहून तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी दोघांनाही दूर करीत वातावरण शांत केले.

मात्र, मागील काही दिवसांपासुनची ही धुसफुशीने चांगलाच पेट घेतल्याचे दिसून आले. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परभणीत दोन्ही नेत्यांना तातडीने मुंबईत 'मातोश्री'वर बोलावण्यात आले. या दोन नेत्यातील मतभेद दूर होऊन पक्षसंघटन मजबुत रहावे यासाठी शिवसेना नेते रामदास कदम व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रयत्न करीत या दोघांतील मतभेद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडून श्री. ठाकरे यांच्यासमोरच समेट घडवून आणला. त्याचबरोबर ठाकरे यांनी यापुढे असे मतभेद होणार नाहीत, असे वचनही दोघांकडून घेतले.

संबंधित लेख