भगवान गडाची कन्या यंदा रुसली कशी?

दसऱ्याच्या दिवशी भगवानगडाचा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे या दिवशी गडावर राजकीय, व्यक्तिगत व सामाजिक मेळावे, सभा किंवा उद्‌घाटन अशा कार्यक्रमास परवानगी देऊ नये. त्या दिवशी गडासह महंतांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच गडावर तीस सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राजकीय व अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंनाही निमंत्रण दिलेले नाही. एव्हढेच नव्हे, तर भगवानगडावरील संस्था स्वायत्त असून, गडावर वर्धापनदिनी मेळावा, सभा व उद्‌घाटन असे कार्यक्रम घेऊ नयेत, असा ठराव विश्‍वस्त मंडळाने केला आहे.
भगवान गडाची कन्या यंदा रुसली कशी?

नगर : मागील वर्षी दसरा मेळावा गडाच्या पायथ्याला घेऊन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माघार घेतल्यानंतर गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात सुरू झालेले वाद अद्यापही कायमच राहिले. त्याचाच परिणाम म्हणून यंदाच्या मेळाव्याला मुंडे यांनी निमंत्रण स्विकारले नाही. 'मला गडाची कन्या म्हणता आणि भाषणाला विरोध करता. गडावर येण्याबाबतचा निर्णय नंतर कळवेन,' असे सांगितल्याने पंकजा मुंडे या वर्षी रुसल्या असल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंदाचा मेळावा होणार की नाही, याबाबत चर्चा झडू लागली आहे.

राजकीय नेत्यांना निमंत्रण नाही
दसऱ्याच्या दिवशी भगवानगडाचा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे या दिवशी गडावर राजकीय, व्यक्तिगत व सामाजिक मेळावे, सभा किंवा उद्‌घाटन अशा कार्यक्रमास परवानगी देऊ नये. त्या दिवशी गडासह महंतांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच गडावर तीस सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राजकीय व अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंनाही निमंत्रण दिलेले नाही. एव्हढेच नव्हे, तर भगवानगडावरील संस्था स्वायत्त असून, गडावर वर्धापनदिनी मेळावा, सभा व उद्‌घाटन असे कार्यक्रम घेऊ नयेत, असा ठराव विश्‍वस्त मंडळाने केला आहे. भगवानगडाचे सर्व जाती-धर्मांचे व सर्व राजकीय पक्षांचे अनुयायी आहेत. त्यामुळे कोणालाही दसऱ्याच्या दिवशी गडावर सभा, मेळावा आदी कार्यक्रमास परवानगी देऊ नये. परवानगी दिली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो. त्याची जबाबदारी शासनावर राहील, असे महंतांनी सांगितले. त्यामुळे राजकीय व्यक्तींना गडाचे दरवाजे बंद केल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

धनंजय मुंडे मात्र येणार
भगवान गडावर दरवर्षीप्रमाणे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मात्र दर्शनाला येणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजते. राजकीय व्यक्ती म्हणून नव्हे, तर भाविक म्हणून ते दर्शनाला येणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमधून हालचाल सुरू झाली आहे. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यातील वितुष्टही सर्वश्रूत आहे. त्यामुळे महंत धनंजय मुंडे यांना जवळ करतात की काय? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

कन्या रुसल्या कशा?
पंकजा मुंडे यांना भगवान गडाच्या कन्या म्हणून संबोधले जाते. गोपीनाथ मुंडे असताना त्यांनी दसरा मेळाव्याची प्रथा सुरू केली. त्यानंतर वडिलांबरोबर पंकजाही गडावर नियमितपणे येत असत. वडिलांच्या निधनानंतर भगवान गड पंकजाला पुर्वीप्रमाणेच प्रेम देईल, अशी स्थितीही निर्माण झाली होती. मात्र नंतर कुठेतरी माशी शिंकली. भगवान गडाच्या कन्येला गडावर राजकीय भाषण करण्यास महंतांनी परवानगी दिली नाही. परिणामी लोकांच्या आग्रहास्तव पायथ्याला मेळावा घेण्याची वेळ आली. हा एक प्रकारे अपमान समजून पंकजा रुसल्या. आता या वर्षी मेळाव्याला येतील की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. आल्या नाही तर मेळाव्यात तथ्य राहणार नाही. त्यामुळे सध्या पाथर्डीतील संयोजकांची धांदल उडाली आहे.

महंतांविषयी सर्वसामान्यांत चीड
कै. गोपिनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा समाज मोठा आहे. मुंडे यांनीच गडाला जगाच्या नकाशावर नेले. त्यांची कन्या पंकजा यांना गडाने दूर केल्याने मुंडेप्रेमींमध्ये राग व्यक्त होत आहे. ज्यांना गडाला मोठे केले, त्यांनाच महंत विसरले. आता गडावर भाषणाला बंदी करून महंत काय साध्य करणार, असा प्रश्‍न भाविकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे यंदा दसरा मेळावा झाला नाही, तर महंतांविषयीची चीड अधिक वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com