Maharashtra Political News Malegaon Mayor | Sarkarnama

मालेगावच्या महापौरांचे राजीनामा अस्त्र

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे या संदर्भात मुख्यमंञ्यांची भेट घेणार आहेत. येत्या दोन दिवसात सत्तारुढ नगरसेवकांची बैठक घेवून कामकाजाचा व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेवू. बांधकाम परवानगी व अन्य कामांबाबत यापुर्वीच आयुक्तांशी चर्चा झाली आहे - महापौर रशीद शेख

मालेगाव : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी सत्तारुढ झालेले काँग्रेसचे महापौर रशीद शेख आयुक्तांच्या भूमिकेने त्रस्त झालेत. रस्त्यावरचा खड्डाही बुजवता येत नसल्याने त्यांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे. ऐवेळी शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी समजुत घातल्याने त्यांनी तो थांबवला आहे. मात्र, त्यामुळे आयुक्त विरुध्द महापौर असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

नगरसेवकांना साधे खड्डेही बुजविता आले नाही. प्रलंबित कामांच्या फाईलींचा ढिग आहे. रिक्त पदांमुळे कामकाजात अडचणी असल्या तरी धिम्या गतीनेही काम मार्गी लागत नाही. विकासकामे ठप्प आहेत. शासन व प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्रस्त झालेल्या महापौर रशीद शेख यांनी आज राजीनामा अस्त्र उपसले. आयुक्तांकडे राजीनामा देण्यासाठी त्यांनी पत्रही तयार केले. पत्रकार परिषद बोलाविली. यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांनी 'याबाबत आढावा घेवून निर्णय घेवू. तुर्त टोकाचे पाऊल उचलू नका', असा सबुरीचा सल्ला दिल्याने राजीनामा नाट्यावर पडदा पडला.

त्याचा हवाला देत महापौर व आयुक्तांनी आज स्वतंत्रपणे पत्रकारांशी चर्चा केली. आयुक्त संगिता धायगुडे यांनी रिक्त पदांबाबत नगरविकास विभागांच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा झाल्याचे सांगितले. महापौर शेख म्हणाले, ''ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे या संदर्भात मुख्यमंञ्यांची भेट घेणार आहेत. येत्या दोन दिवसात सत्तारुढ नगरसेवकांची बैठक घेवून कामकाजाचा व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेवू. बांधकाम परवानगी व अन्य कामांबाबत यापुर्वीच आयुक्तांशी चर्चा झाली आहे'' यानंतर महापौरांनी राजीनामा देण्याचा निर्णय तुर्त स्थगित केला.

आयुक्त धायगुडे यांनी महापौरांच्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. ''आगामी काळात सर्व प्रलंबित फाईलींचा आढावा घेवू. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फाईल जाणूनबुजून रखडविल्यास निलंबनाची कारवाई करु. रिक्त पदासाठी पाठपुरावा सुरु आहे. मी स्वत: रोज किमान पाच महत्त्वाच्या फाईल निकाली काढण्याबाबत महापौरांशी चर्चा केली आहे,'' असे त्यांनी सांगितले.

 

संबंधित लेख