Maharashtra Political News Latur Amit Deshmukh | Sarkarnama

ऊसाची सर अन् सुरक्षित अंतर

विकास गाढवे
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पावसाची अनियमितता, रासायनिक खताच्या अतीवापरामुळे बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून उत्पादन घटत चालले आहे. याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळवण्यासाठी आमदार देशमुख संस्थापक अध्यक्ष असलेल्या विकास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या सेंद्रीय ऊस परिषदेचे आयोजन केले होते. सेंद्रीय व रासायनिक शेतीचा धागा पकडून आमदार देशमुख यांनी सभोवताली सातत्याने घुटमळणाऱ्या कार्यकर्त्यांची हजेरी घेतली.

लातूर : नेत्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा नेहमी गराडा असतो. यामुळे सामान्य माणसांना त्यांच्यापर्यंत पोहचता येत नाही. त्याच त्या कार्यकर्त्यांचे कडे तोडून सामान्यांना भेटता येत नाही. कार्यकर्त्यांना बाजूला सारणे नेत्यांना कठीण होऊन बसते. थोड दूर रहा, हे सांगून कार्यकर्त्यांसोबत 'सुरक्षित अंतर' ठेवायचे कसे, असा प्रश्न नेत्यांना पडतो. बुधवारी (ता. सहा) येथे आयोजित जिल्हा सेंद्रिय ऊस परीषदेच्या निमित्ताने आमदार अमित देशमुख यांनी रासायनिक व सेंद्रीय शेतीचे उदाहरण देत कार्यकर्त्यांना थोडे दूर राहण्याचा सल्ला दिला. ऊसाची चांगली वाढ व्हायची असेल, तर सरीतील अंतर योग्य राखले पाहिजे, असेही ते सांगायला विसरले नाहीत.

पावसाची अनियमितता, रासायनिक खताच्या अतीवापरामुळे बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून उत्पादन घटत चालले आहे. याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळवण्यासाठी आमदार देशमुख संस्थापक अध्यक्ष असलेल्या विकास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या सेंद्रीय ऊस परिषदेचे आयोजन केले होते. सेंद्रीय व रासायनिक शेतीचा धागा पकडून आमदार देशमुख यांनी सभोवताली सातत्याने घुटमळणाऱ्या कार्यकर्त्यांची हजेरी घेतली. अनेक लोक आपणाला भेटायला येतात. काहीतरी सांगण्यासाठी येतात. मात्र, ते भेटू व बोलूही शकत नाहीत. यामुळे सोबतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थोडे अंतर ठेऊन राहायला पाहिजे. दोन सरीमध्ये सहा फुट अंतर ठेवल्यास ऊसाची चांगली वाढ होते. असेच 'अंतर' ठेवल्यास नेत्यांसोबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चांगली वाढ होईल. यामुळे हे 'अंतर' सर्वांच्याच फायद्याचे आहे, असेही आमदार देशमुख यांनी पटवून दिले.

सेंद्रीय ऊसाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे सांगतानाच आमदार देशमुख यांनी आपणही आता हळूहळू 'सेंद्रीय' होत असल्याचे सांगितले. इतके दिवस आपण रासायनिक होतो. पण सेंद्रीय होण्यासाठी तीन वर्ष लागतील, असेही त्यांनी नमूद करताच  कड्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते अस्वस्थ झाले.

दादांभोवती कोणीच नाही
सहज बोलण्यातूनही शिव्यांचा वापर करत सडतोड भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माजी आमदार वैजनाथ शिंदे यांना मात्र, 'सोबती'चा त्रास नाही. यामुळे 'अंतरा'चा विषय त्यांना लागू नव्हता. तरीही 'अंतरा'चा विषय निघाल्यानंतर आमदार देशमुख यांनी श्री. शिंदे यांना तुमच्यासोबत सध्या कोण आहे? असा थेट प्रश्न केला. श्री. शिंदे यांनी नकारार्थी मान हलवत सोबत कोणीही नसल्याचे सांगितले. त्यावर आमच्यापर्यंत सर्व माहिती येते. सोशल मिडियासह अनेक माध्यमांतून ही माहिती येत असल्याचे सांगताच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांकडे कटाक्ष टाकला.

संबंधित लेख