Maharashtra Political News Girish Mahajan Nashik | Sarkarnama

गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

गुलालवाडी व्यायामशाळेच्या चिमुकल्यांसमवेत पालकमंत्री महाजन लेझीम खेळले. त्यानंतर त्यांनी ढोल वाजवला. पुढे मग पालकमंत्र्यांनी नृत्यासाठी पोझ घेताच त्यांच्या शेजारी उभे राहून पोलिस निरीक्षकांनी बंडलमधील नोटा मोजल्या. त्यातील एक नोट काढून पालकमंत्र्यांना ओवाळणी केली. क्षणात ही गोष्ट लक्षात येताच पालकमंत्र्यांनी त्यांना रोखले.

नाशिक : गणेश विर्सजन मिरवणूकीत लेझीम खेळत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी  ढोलच्या तालावर ठेका धरला.  मंत्री नाचताहेत म्हटल्यावर वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनीही पालकमंत्र्यांवर नोट ओवाळल्या. हे कमी म्हणून श्री. सूर्यवंशी यांनी कमरेला रिव्हॉल्व्हर लावलेल्या स्थितीत कार्यकर्त्यांसमवेत ठेका धरला.

गुलालवाडी व्यायामशाळेच्या चिमुकल्यांसमवेत पालकमंत्री महाजन लेझीम खेळले. त्यानंतर त्यांनी ढोल वाजवला. पुढे मग पालकमंत्र्यांनी नृत्यासाठी पोझ घेताच त्यांच्या शेजारी उभे राहून पोलिस निरीक्षकांनी बंडलमधील नोटा मोजल्या. त्यातील एक नोट काढून पालकमंत्र्यांना ओवाळणी केली. क्षणात ही गोष्ट लक्षात येताच पालकमंत्र्यांनी त्यांना रोखले. इथून त्यांनी काढता पाय घेतला असताना पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत नृत्य सुरू राहिले. कार्यकर्ते नाचण्यात दंग होताच पालकमंत्री जामनेरकडे रवाना झाले.

या घटनेला बराच वेळ झाला असताना श्री. सूर्यवंशी यांच्याकडून नोटांची ओवाळणी सुरू राहिली. उत्साही कार्यकर्त्यांकडून नोटांची ओवाळणी होतेय म्हटल्यावर श्री. सूर्यवंशी यांनीही नोटा बाहेर काढल्या. सुरवातीला फेट्यावर नोटांची ओवाळणी करणाऱ्या सूर्यवंशींनी नंतर सफेद टोपी डोईवर परिधान करून दौलतजादा सुरूच ठेवली. मात्र, नंतर त्यांनी कमरेला असलेले रिव्हॉल्व्हर कायम ठेवून कार्यकर्त्यांसमवेत ठेका धरल्यावर त्यांच्या डोक्‍यावर टोपी नव्हती. ही सारी ठळक दृश्‍ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

संबंधित लेख