Maharashtra Political News Girish Mahajan | Sarkarnama

भाजपच्या गडावर कोण कोण येणार? : गिरीश महाजनांच्या वक्तव्याने चर्चेला ऊत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

डोकं काम करणार नाही असे लोक भाजपात येतील अशी टिप्पणी भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने भाजपच्याच गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या गडावर आता कोण-कोण येणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

जळगाव : डोकं काम करणार नाही असे लोक भाजपात येतील अशी टिप्पणी भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने भाजपच्याच गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या गडावर आता कोण-कोण येणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनजंय महाडीक तसेच जळगावचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्यापर्यंत आता चर्चा सुरू झाली आहे. या नावांची चर्चा होणार असेल तर महाजनांच्या म्हणण्यानुसार खरोखरच पक्षातील निष्ठावंतांचे डोके काम करणार नाही, असेच दिसते.

जळगाव येथील भाजपच्या जिल्हा बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक सूचक विधाने केल्याने कार्यकर्ते आता संभ्रमात पडले आहेत. त्यांनी थेट दिल्लीचे उदाहरण देत सांगितले की, दिल्लीत महापालिका निवडणुकीत नवीन लोकांना संधी दिली आणि त्या ठिकाणी तीन चतुर्थांशपेक्षा अधिक उमदेवार निवडून येण्याची किमया घडली आहे. आता पक्षातील कोणाच्याही नातेवाईकांना उमेदवारी देण्यात येणार नाही. पक्षात येण्यासाठी अनेकांची रिघ लागली आहे, भविष्यात अनेक लोक येत आहेत कदाचित विधिमंडळात आम्हालाही शेवटच्या रांगेत बसावे लागेल. याला घेऊ नका, त्याला घेऊ नका असे आता कोणी म्हणू नका, असेही त्यांनी स्पष्टपणे सुनावले आहे. पक्षातून कोणीही अगदी मी जरी बाजूला झालो तरी पक्ष वाढणारच आहे. पक्षात नाराज असलेल्यांना त्यांनी हा टोला लगावला असल्याचे सूचकपणे दिसत आहे.

कोण येणार, याबाबत उत्सुकता
महाजनांच्या वक्तव्यामुळे पक्षात आता कोण येणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. कॉंग्रेसचे नेते नारायण राणे पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू आहे, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनजंय महाडीक यांच्या भाजप प्रवेशाबातही तर्कवितर्क सुरू आहेत. दरम्यान, महाजन यांचे निकटवर्ती असलेले जळगावचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या प्रवेशाची चर्चा गेल्याकाळात सुरु झाली होती. मात्र त्यांनी त्यावेळी ''शिवसेनेत सध्या मी समाधानी आहे'', असे स्पष्ट सांगितले होते. परंतु, आता महाजन यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्याही भाजप प्रवेशाबद्दल चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील काही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज आहेत, त्यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा सुरु आहे. रविवारी अमळनेरच्या नगराध्यक्षा तथा माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी पुष्पलता पाटील यांच्यासह त्यांच्या संपूर्ण आघाडीने भाजपत प्रवेश केला. त्यापाठोपाठ जिल्ह्यातील माजीमंत्री, विद्यमान आमदारही भाजप प्रवेशाच्या रांगेत असल्याचे बोलले जात आहे.

जळगाव शहरातही हालचाली
जळगावचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे सुध्दा भाजपच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे, याशिवाय जळगाव महापालिकेत सत्तेत असलेल्या खानदेश विकास आघाडीत सध्या फारसे आलबेल नाही, त्यामुळे या आघाडीतील काही जण भाजपच्या वाटेवर आहेत काय? असा प्रश्‍न सामान्य कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. त्यातूनच जळगाव महापालिकेवर भाजपच्या झेंडा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखविल्याचे श्रेय महाजन यांना मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता आहे. पालिका आणि महापालिकांवरही भाजपचा झेंडा फडकतोय, अशा स्थितीत भाजप आता मोठा पक्ष होतोय त्यामुळे आता या गडावर बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढणार हेच आता महाजन यांच्या विधानावरून निश्‍चित झाले आहे. जळगाव जिल्ह्यात परंतु, याआधी पक्षाला सत्तेपर्यंत पोचविण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या निष्ठावंतांच्या तंबूत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

संबंधित लेख