Maharashtra Political News Chandrakant Patil Comment on Shivsena | Sarkarnama

शिवसेनेचे घराघरांत हसू : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

सत्तेतून बाहेर पडण्याची सतत धमकी देणाऱ्या शिवसेनेचे घराघरांत हसू होत आहे. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावून शिवसेना स्वतःचे हसू करून घेत असल्याचा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला आहे

घरचा वाद रस्त्यावर आणणे अयोग्य

कोल्हापूर : सत्तेतून बाहेर पडण्याची सतत धमकी देणाऱ्या शिवसेनेचे घराघरांत हसू होत आहे. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावून शिवसेना स्वतःचे हसू करून घेत असल्याचा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.

शिवसेनेच्या सततच्या आंदोलनांबाबत विचारले असता ते म्हणाले, ''शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची सतत धमकी देते; पण ती प्रत्यक्षात बाहेर पडणार नसल्याची मानसिकता आहे. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. शिवसेनेची आंदोलने पाहून घराघरांत आता लोक त्यांना हसू लागले आहेत. शिवसेनेचे यामुळे नुकसान होत आहे. घरातील भांडणे घरात चर्चेने सोडवायची असतात. मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी नेहमी उपलब्ध असताना घरचा वाद रस्त्यावर आणणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे.''

ते पुढे म्हणाले, ''शिवसेनेकडे असलेल्या खात्यांबाबत भाजपने कधीच टीका केली नाही; उलट उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहिलो.''

उस्मानाबाद पहिला जिल्हा कर्जमुक्त
कर्जमाफीबाबत मंत्री पाटील म्हणाले, ''ही प्रक्रिया दिवाळीपूर्वी नक्की पूर्ण होईल; पण त्या अगोदर बॅंकांनी आपली माहिती देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी बॅंकांचे काम पूर्ण होईल, तेथे पहिल्यांदा कर्जमाफी होईल. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सर्वात अगोदर पूर्ण करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुदत वाढविल्यास संपूर्ण प्रक्रिया वाढते. यामुळे कर्जमाफी मिळण्यासही विलंब होतो. यामुळे मुदत वाढवायला नको. शिल्लक राहिलेल्यांनाही नंतर याचा लाभ देता येईल, या दृष्टीने प्रयत्न करीत होतो; परंतु शेतकरी संघटना व विरोधी पक्षांच्या दबावामुळे आठ दिवस प्रक्रिया लांबली. कर्जमाफीचे सॉफ्टवेअर पूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय माहिती देऊ शकत नाही. शुक्रवारी (ता. 22 सप्टेंबर) प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली. यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास शेतकऱ्यांना विलंब होत आहे. तरीही आम्ही दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उस्मानाबाद येथे मंत्री दिवाकर रावते यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. बॅंकांनी तातडीने माहिती देण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे तो कर्जमाफी मिळणारा पहिला जिल्हा असेल.''

राणेच निर्णय घेतील
माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजप पक्षप्रमुख अमित शहा यांना भेटले ते त्यांच्या मेडिकल कॉलेजसंदर्भात. त्यावेळी त्यांच्याविषयीही चर्चा झाली. शहा यांनी दोन्ही बाजू राणे यांना सांगितल्या आहेत. त्यामुळे आता राणे यांनाच निर्णय घ्यायचा आहे. ते विचार करून दसऱ्यादिवशी आपला निर्णय घेतील असे वाटते, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.  

 

 

संबंधित लेख