Maharashtra Political News Beed Bhagwangad Row | Sarkarnama

भगवान गडाच्या युध्दात बीड जिल्ह्यातील शिलेदारच गप्प

दत्ता देशमुख
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

यंदाचा दसरा मेळावा अवघ्या चार-पाच दिवसांवर येऊन ठेपलेला असतांना पुन्हा वाद विकोपाला पोहचला आहे. भगवान गडावर मेळावा नको या भूमिकेवर महंत ठाम आहेत, तर पंकजा मुंडे यांनी गडावर मेळावा घेऊन भाषण करावे यासाठी त्यांचे समर्थक जिद्दीला पेटले आहेत. एकंदरित पंकजा मुंडे यांच्यासाठी हा कसोटीचा काळ म्हणावा लागेल. या निमित्ताने पंकजा विरोधक देखील सक्रीय झाले असून गडावर मेळावा नको अशी भूमिका घेत बैठकावर बैठका आणि आणि प्रशासनाला निवेदन धाडण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे.

बीड : एखाद्या महत्वाच्या प्रसंगी जवळची व्यक्ती हजर नसेल तर त्यावर 'शिकार के दिन खाडा; अशी खास हिंदीतील म्हण ग्रामीण भागात प्रसिध्द आहे. सध्या भगवान गडावरील वादाच्या पार्श्‍वभूमीवर राजाच्या ग्रामविकास व बालकल्याण तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात सध्या अशीच काहीशी परिस्थिती आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंकजा समर्थक 'भगवान गडावर मेळावा घ्या', या मागणीसाठी दबाव आणत आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्यामुळे विविध पद भुषवणारे जिल्ह्यातील त्यांचेच शिलेदार मात्र गप्प बसून आहेत.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी 1993 पासून भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास सुरूवात केली. मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातील ऊसतोड वंजारा समाजाची एकजूट निर्माण करून या समाजाला स्फुर्ती आणि दिशा देण्याचे काम त्यांनी केले. या माध्यमातून आपल्या मागे असलेली समाजाची ताकद राज्याला दाखवण्याची सुवर्ण संधी देखील गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी साधली. 2013 च्या दसरा मेळाव्याचे भाषण मुंडे यांचे शेवटचे ठरले. त्यानंतर पुढची दोन वर्ष पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरून भाषण करत वडीलांची परंपरा कायम राखली. पण त्याला महंतांशी झालेल्या वादाची किनार होती. त्यातच पंकजा मुंडें यांनी परळी येथे गोपीनाथ गडाची निर्मिती केली आणि भगवान गड विरुध्द गोपीनाथ गड अशा नव्या वादाला तोंड फुटले.

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी याच मेळाव्यात बोलतांना पंकजा मुंडे भगवान गडाच्या कन्या असतील, पण भगवानगड अध्यात्मासाठी आणि गोपीनाथगड राजकारणासाठी असेल असे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या वर्षीचा मेळावा गडा ऐवजी पायथ्याशी झाला.

महंत ठाम, पंकजा समर्थकही इरेला पेटले
यंदाचा दसरा मेळावा अवघ्या चार-पाच दिवसांवर येऊन ठेपलेला असतांना पुन्हा वाद विकोपाला पोहचला आहे. भगवान गडावर मेळावा नको या भूमिकेवर महंत ठाम आहेत, तर पंकजा मुंडे यांनी गडावर मेळावा घेऊन भाषण करावे यासाठी त्यांचे समर्थक जिद्दीला पेटले आहेत. एकंदरित पंकजा मुंडे यांच्यासाठी हा कसोटीचा काळ म्हणावा लागेल. या निमित्ताने पंकजा विरोधक देखील सक्रीय झाले असून गडावर मेळावा नको अशी भूमिका घेत बैठकावर बैठका आणि आणि प्रशासनाला निवेदन धाडण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. एकीकडे विरोधक आक्रमक झाले असतांना पंकजा यांचे होम पीच असलेल्या बीड जिल्ह्यातील त्यांचे शिलेदार मात्र सुस्तावलेले दिसतात. जिल्ह्यात एक खासदार, चार आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंक,जिल्हा परिषदेची सत्ता असून देखील भगवान गडावरील मेळाव्या संदर्भात मात्र कुणीच भूमिका घेत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

काही तरुण समर्थकांनी सोशल मिडीयावरून पंकजा मुंडेचे समर्थन सुरू केले असले तरी जिल्ह्यात मोठी पद भुषवणाऱ्या बड्या पदाधिकाऱ्यांनी मात्र अद्याप मेळाव्याच्या समर्थनार्थ एक पत्रक देखील काढलेले नाही. एरव्ही पंकजा मुंडे यांच्या भोवती घोळका जमवून असणारे नेमके लढाईच्या वेळी गायब झाल्यामुळे महत्वाच्या टप्पयावरील ही राजकीय लढाई पंकजा मुंडे जिंकणार कशी अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

समाजाला भरभरून दिले
दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्व वंजारा समाजाच्या भक्कम पाठिंब्यामुळे उभे राहिले. आता तीच ताकद वंजारा समाजाने पंकजा मुंडेंच्या मागे उभी केली आहे. संपर्काच्या अभावामुळे समाजावरील पंकजा यांची पकड काही प्रमाणात सैल झाल्याची चर्चा देखील अधून मधून होत असते. नगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकामध्ये पक्षाला बसलेल्या फटक्‍यामुळे या चर्चेला पुष्टी मिळते. पंकजा यांनी हे वेळीच ओळखले आणि त्यांनी समाजावरील पकड घट्ट करण्यासाठी काही निर्णय घेतले.

अगदी खुल्या प्रवर्गातील महिलासाठी असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी वंजारा समाजाला दिले. जिल्हा नियोजन समितीच्या खुल्या प्रवर्गातील सात जागावर देखील वंजारा समाजाच्या व्यक्तींना स्थान देऊन त्यांनी समाजाचा आपल्यावरील विश्‍वास बळकट करण्याच प्रयत्न केला. परंतु आज पंकजा यांना बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली तेव्हा पद घेणारी मंडळी कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संबंधित लेख