Maharashtra Politcs News Pankaja Munde Aanganwadi | Sarkarnama

पंकजा मुंडेंना गडावर विरोधासाठी त्रयस्थांना ताकद

मुरलीधर कराळे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

भगवान गडावर दसरा मेळावा होण्याबाबत खलबते सुरू आहेत. महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडावर राजकीय भाषण होऊ न देण्याची घेतलेली भूमिका व भाजप कार्यकर्त्यांनी गडावरच मेळावा घेणार असल्याचा ठाम निर्णय केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहेत.

नगर : अंगणवाडीच्या विविध मागण्यांसाठी सध्या जिल्हाभर व राज्यभर मोर्चे निघत आहेत. त्यात अंगणवाड्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत व सरकारविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. मात्र, मागील आठवड्यांपासून या घोषणांत आणखी एका नव्या सूराची भर पडली. ती म्हणजे, 'मागण्या मान्य न झाल्यास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भगवान गडावर पाऊलही ठेवू देणार नाही.' नगरच्या एका संघटनेनेही यापूर्वी कायद्याचा बडगा उगारून मुंडे यांना गडावर येण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे आता त्रयस्थ शक्ती मुंडेच्या विरोधात सक्रीय होऊ लागली आहे. त्यांना ताकद कोण देते, हे न उलगडणारे कोडे असल्याचे राजकीय वर्तुळातून चर्चिले जात आहे.

भगवान गडावर दसरा मेळावा होण्याबाबत खलबते सुरू आहेत. महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडावर राजकीय भाषण होऊ न देण्याची घेतलेली भूमिका व भाजप कार्यकर्त्यांनी गडावरच मेळावा घेणार असल्याचा ठाम निर्णय केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहेत. याच दरम्यान राज्यभर अंगणवाडी सेविकांचे मोर्चे सुरू आहेत. त्यांच्या मानधन वाढीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी या महिलांनी ठिकठिकाणी 'रास्ता रोको'सारखी आंदोलने सुरू केली आहेत. ही मागणी मान्य करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना साकडे घातले जात आहेत. मागणी मान्य झाली नाही, तर पंकजा मुंडे यांना गडावर पाऊलही ठेवू देणार नाही, अशा घोषणा आता या मोर्चातून निघू लागल्या आहेत. त्यामुळे गडावर पंकजा मुंडे न येण्यासाठी अंगणवाडी संघटना हा आणखी एक त्रयस्त विरोधक तयार झाला आहे.

या पूर्वीही नगरमधून काही संघटनांनी कायद्याचा बडगा उगारत धार्मिक स्थळावर राजकीय भाषण करण्यास विरोध दर्शविणारे निवेदन दिले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे याना भगवान गडाचे दरवाजे बंद करण्यासाठी इतर मार्गाचाही वापर होताना दिसत आहे, अशी चर्चा सुरू होत आहे.

भगवानगडावर बैठकीबाबत पालकमंत्र्यांवरही टीका
भगवानगडावर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणीवजा टीका करणारे पत्रक पाथर्डीतील भाजयुमोच्या एका पदाधिकाऱ्याने काढून पक्षांतर्गत चिमटा काढला आहे. राम शिंदे हे भाजपचे असताना पंकजा मुंडे यांना विरोध कसा होऊ देतात, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत कार्यकर्त्यांमध्येही दुफळीची नांदी ठरू लागली आहे.

संबंधित लेख