Maharashtra people are eager to know stand of politicians | Sarkarnama

राजकीय पक्षांच्या भूमिकांची उत्सुकता

अतुल क.तांदळीकर
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

आजकाल गल्ली ते दिल्ली निव्वळ निवडणूकांचीच चर्चा आहे.उन्हाळ्यात लोकसभा आणि आता नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये पाच राज्यांच्या निवडणूका आहेत. या निवडणूकांमध्ये राजकीय पक्षांकडून मतांची जुळवाजुळव सुरू झाली. महाराष्ट्रात देखील घडामोडींना वेग आलाय. उमेदवारांची चाचपणी आणि समविचारी पक्षांना जवळ करणे यावरच आता भर दिला जात आहे, याचाच अर्थ तूर्त कोणत्याही पक्षाला स्वबळावर येण्याची खात्री नाही असे चित्र आहे....

महाराष्ट्रात आता भाजप शिवसेना मित्रपक्षांचेच सरकार आहे. या सरकाच्या कामगिरीच्या आधारावर लोकांनी त्यांना पुन्हा निवडून द्यायचे म्हटले तरी तशी परिस्थिती आज तरी स्पष्ट नाही.  या सरकारच्या काळातील कामे अजूनही प्रलंबित अवस्थेत आहेत, केवळ खानदेश,मराठवाड्याची उदाहरणे घेतली तरी या सरकारला पुन्हा निवडून देण्याबाबत मतदार साशंक आहेत. 

म्हणूनच या सरकारातील प्रमुख पक्ष आज जरी युती बाबत ठोस हालचाली करीत नसल्याचे दिसत असले तरी आगामी काळात ते पुन्हा समविचारी मित्र पक्षांना जवळ करून सत्तेत येण्यासाठी अनेक क्‍लृप्त्या आखतील यात वाद नाही. जे सत्तेत नाहीत त्यांना देखील मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतांना दिसत आहे, खानदेशात कॉंग्रेसच्या संघर्ष यात्रेला मिळालेला प्रतिसाद बघता या पक्षाला उमेदवार मिळणे देखील अवघड झाल्याचे त्यांच्या नेत्यांच्या लक्षात आले असेल.  त्या तुलनेत राष्ट्रवादी पक्ष अधिक सक्रीय झाल्याचे आढळत आहे, उमेदवारांच्या चाचपणीत त्यांनी आघाडी घेतल्याचे मुंबईतील बैठकीत दिसून आले.

तिकडे प्रकाश आंबडेकर सध्या जास्तच सक्रीय आहेत, एमआयएमशी हातमिळवणी केल्यावर त्यांनी मुंबईत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्याशी केलेली चर्चा आणि आमदार कपिल पाटील यांच्याशी साधलेला संवाद त्यांच्या निवडणूक रणनीतीतील चातूर्य स्पष्ट करतो. निवडणूकांमध्ये जात हा घटक खुप प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे, आजवरचा इतिहास हेच सांगतो, प्रकाश आंबेडकरांच्या रिपब्लीकन पक्षाने खास करून वऱ्हाडात हे दाखवून दिले आहे. 

दोन्ही कॉंग्रेसपक्षाचे उमेदवार पराभूत होण्याला आंबेडकर कारणीभूत ठरल्याचे तेथील पराभूत उमेदवार आयुष्यभर विसरणार नाहीत असा त्यांचा करिश्‍मा आहे. आता तर ज्या मतांकडे कॉंग्रेसपक्ष आजवर सुरक्षित व्होट बॅंक म्हणून बघत आला त्या मुस्लीम मतांवर एमआयएमच्या ओवेसींनी कब्जा केला आहे, आणि ते आंबेडकरांसोबत आहेत,त्यामुळे हे मतांचं धृवीकरण प्रमुख सर्व राजकीय पक्षांना चिंता करायला लावणारं आहे.युती-आघाडीच्या राजकारणाच्या मानसिकतेतून स्वबळावर निवडून येण्याची खात्री नसलेले हे राजकीय पक्ष आगामी काळात नेमक्‍या कोणत्या भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

संबंधित लेख