Maharashtra News Dawood Ibrahim building | Sarkarnama

दाऊदच्या कुटुंबीयांना इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सफेमा कायद्यानुसार 2002 मध्ये भेंडीबाजाराच्या पाकमोडिया स्ट्रीटवरील डामरवाला इमारतीवर टाच आणण्यात आली होती. याविरोधात कासकर याने न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयानेही घर सोडण्याचे आदेश दिले होते; मात्र तरीही इक्‍बाल कासकर या घरात राहत आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचे घर असलेले पाकमोडिया स्ट्रीटवरील डाबरवाला इमारत रिकामी करण्याची नोटीस केंद्रीय अर्थ खात्याच्या महसूल विभागाने पाठवली आहे. स्मगलिंग ऍण्ड फॉरेन एक्‍स्चेंज मॅनिप्युलेशन (सफेमा) कायद्यानुसार टाच आलेल्या या इमारतीत दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकर हा बेकायदा राहत आहे. त्याला ही इमारती धोकादायक असल्याने तत्काळ रिकामी करण्याची नोटीस सफेमाच्या सहआयुक्तांनी पाठवली आहे.

या परिसरात नुकतीच हुसैनी इमारत पडून 33 जणांचा बळी गेला होता. कासकर कुटुंबाशी संबंधित असलेली जे.जे. मार्ग येथील शबनम गेस्ट हाऊसलाही अशी नोटीस पाठविण्यात आली आहे. सफेमा कायद्यानुसार 2002 मध्ये भेंडीबाजाराच्या पाकमोडिया स्ट्रीटवरील डामरवाला इमारतीवर टाच आणण्यात आली होती. याविरोधात कासकर याने न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयानेही घर सोडण्याचे आदेश दिले होते; मात्र तरीही इक्‍बाल कासकर या घरात राहत आहे. महापालिकेने 2015 मध्ये ही इमारत धोकादायक असल्यामुळे तत्काळ रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती. त्यानंतरही त्याने या इमारतीचा ताबा सोडलेला नाही. कासकरसह आणखी काही कुटुंब इमारतीत राहत आहेत.

डाबरवाला इमारत सफेमाच्या कायद्यात अंतर्गत केंद्रीय महसुल विभागाच्या ताब्यात ही धोकादायक इमारत आहे. त्यामुळे ही इमारत कोसळल्यास त्या दुर्घटनेची जबाबदारी थेट महसूल विभागावर येऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून सफेमाचे सहआयुक्त आर.एन. डिसोझा यांनी नोटीस पाठवली आहे.

संबंधित लेख