Maharashtra News ACB Chief post Vacant | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

प्रमुखाअभावी एसीबीची कारवाई राज्यभर मंदावली

उत्तम कुटे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

राज्य पोलिस दलाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) गेल्या सव्वा वर्षापासून महासंचालकच (डीजीपी) नसल्याने राज्यभरातील लाचखोरीची कारवाई मंदावली आहे. त्याला एसीबीतील  जबाबदार सूत्रांनी दुजोरा दिला. प्रमुखच नसल्याने लाच घेतानांच्या   प्रकरणांत (ट्रॅप) 14 टक्यांनी घट झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत हे प्रमाण 23 टक्यांपर्यंत खाली आलेले होते.

पिंपरी : राज्य पोलिस दलाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) गेल्या सव्वा वर्षापासून महासंचालकच (डीजीपी) नसल्याने राज्यभरातील लाचखोरीची कारवाई मंदावली आहे. त्याला एसीबीतील  जबाबदार सूत्रांनी दुजोरा दिला. प्रमुखच नसल्याने लाच घेतानांच्या   प्रकरणांत (ट्रॅप) 14 टक्यांनी घट झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत हे प्रमाण 23 टक्यांपर्यंत खाली आलेले होते. दरम्यान,हे पद रिक्त असल्याने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याही रखडण्याची शक्यता आहे.
 
राज्यात डीजीपीची चार पदे आहेत.त्यात एसीबीचे एक आहे. तेथील तत्कालीन डीजीपी सतीश माथूर हे गेल्यावर्षी 30 जूनला राज्याचे प्रमुख (डीजीपी) झाले. तेव्हापासून एसीबीचे डीजीपीपद रिक्त आहे. त्याचा तात्पुरता पदभार याच विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विवेक फणसळकर यांच्याकडे सध्या आहे. ते प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र, प्रभारी पदामुळे त्यांच्या कारभारावर मर्यादा आहेत.

परिणामी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंच्या कालावधीत एसीबीच्या कारवाईत मोठी घट झाली आहे. एसीबीची आकडेवारीच त्याला दुजोरा देत आहे. गेल्यावर्षी 12 सप्टेंबरपर्यंत एसीबीचे 709 लाचखोरीचे यशस्वी सापळे तथा ट्रॅप झाले होते. यावर्षी त्यात 101 ने घट होऊन ते 608 वर आले आहे. 810 भ्रष्ट सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले.त्यांनी एक कोटी 77 लाख 18 हजार 620 रुपये एवढी लाच स्वीकारलेली आहे.2017 च्या पहिल्याच महिन्यात,तर ट्रॅपची कारवाई तब्बल 53 टक्यांनी खाली आलेली आहे. गत महिन्यात ते 8 टक्यांनी कमी झाले.

पद रिक्त असल्याचा दुहेरी फटका
प्रमुखाअभावी एसीबीची कारवाई थंडावली तर आहेच. शिवाय,त्याचा फटका आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना बसतो आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणाऱ्या पाचजणांच्या आस्थापना मंडळाचे एसीबीचे डीजीपी हे सुद्धा सदस्य आहेत. त्यामुळे हे पद तातडीने भरावे, अशी मागणी राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी गृहविभागाकडे एप्रिल महिन्यातच केलेली आहे. तेथे डीजीपी समकक्ष अधिकारी सध्या राज्य पोलिस दलात उपलब्ध नसल्याने तेथे अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला बढती द्यावी असा प्रस्ताव गेल्या वर्षी महासंचालकांनी सरकारला दिलेला आहे. त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही.

कामगिरी खालावण्याची हॅटट्रिक
प्रवीण दीक्षित हे एसीबीचे डीजीपी झाल्यानंतर या विभागाची कामगिरी 2014 मध्ये उंचावली गेली. ट्रॅपचा आकडा दुप्पट झाला. 2013 मध्ये तो 583 होता. 2014 ला तो 1245 वर गेला. 2015 पासून त्यात घसरण होण्यास सुरवात झाली. त्यावर्षी तो 1234 झाला. मात्र, दीक्षित यांची बदली झाली आणि गेल्या दोन वर्षात हा चढता आलेख झपाट्याने खाली आला. गतवर्षी तो 985 झाला.तर, यावर्षी तो 608 आहे.त्यामुळे ट्रॅपची कामगिरी खालावण्याची हॅटट्रिक यावेळी नक्की होणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज उरलेली नाही.

संबंधित लेख