Maharashtra Finance Department Secretary Pandharpur | Sarkarnama

वित्त विभागाचे अपर सचिव स्वतःच्या विभागाविषयी अनभिज्ञ?

भारत नागणे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

साहेब जीएसटी मुळे राज्याचे उत्पन्न किती वाढणार आहे....सर्वसामान्य लोकांना त्याचा किती फायदा होईल... नोकर कपातीमुळे शासनाचे किती पैसे बचत होतील... यावर्षीच्या अर्थ संकल्पात जलयुक्तशिवार योजनेसाठी किती निधी उपलब्ध केला आहे...यासह अर्थ खात्याविषयी संबंधित असलेल्या एकाही प्रश्‍नावर उत्तर न देता या विषयी मला काहीच माहिती नाही, असे उत्तर दिले आहे. राज्याच्या वित्तविभागाचे अपर मुख्य सचिव व्ही.गिरिराज यांनी!  व्ही.गिरिराज यांना पत्रकारांना माहिती न देता टाळायचे होते की, खरचं वित्त विभागाच्या कामकाजा बाबत ते अनभिज्ञ आहेत या विषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पंढरपूर : साहेब जीएसटी मुळे राज्याचे उत्पन्न किती वाढणार आहे....सर्वसामान्य लोकांना त्याचा किती फायदा होईल... नोकर कपातीमुळे शासनाचे किती पैसे बचत होतील... यावर्षीच्या अर्थ संकल्पात जलयुक्तशिवार योजनेसाठी किती निधी उपलब्ध केला आहे...यासह अर्थ खात्याविषयी संबंधित असलेल्या एकाही प्रश्‍नावर उत्तर न देता या विषयी मला काहीच माहिती नाही, असे उत्तर दिले आहे. राज्याच्या वित्तविभागाचे अपर मुख्य सचिव व्ही.गिरिराज यांनी!  व्ही.गिरिराज यांना पत्रकारांना माहिती न देता टाळायचे होते की, खरचं वित्त विभागाच्या कामकाजा बाबत ते अनभिज्ञ आहेत या विषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

काही वर्षापूर्वी व्ही. गिरिराज जलसंधारण विभागाचे सचिव होते. त्यांच्या कार्यकाळात सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजनेतून काही कामे करण्यात आली होती. त्या कामांची पाहणी करण्यासाठी ते आले होते. पाहणी दौऱ्यानंतर ते आज विठ्ठल दर्शनासाठी सकाळी पंढरपुरात आले होते. विठ्ठल दर्शनानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन सुरवातीला जलयुक्त शिवार योजनेच्या पाहणी दौऱ्या विषयी विचारले असता, ते म्हणाले सध्या जलयुक्तशिवार योजनेशी माझा संबंध नाही. परंतु, पूर्वी हा विभाग माझ्याकडे होता. त्यावेळी या भागात जलसंधारणाची कामे केली होती. त्याची पहाणी करण्यासाठी मी आलो होतो.

कुठे कुठे पाहणी केले असे विचारले असता. त्यांनी शेजारी बसलेल्या अधिकाऱ्यांकडे पाहात गावांची नावे विचारून घेतली आणि मग ती पत्रकारांना सांगितली. त्यानंतर अर्थखात्या विषयी संबंधित असलेल्या जीएसटी, नोकरी कपाती सह शासना इतर आर्थिक धोरणा विषयी विचारले असता एकाही प्रश्‍नांवर त्यांनी उत्तर न देता, मला या विषयी फार माहिती नाही. अर्थ विभागात माझ्या सारखे अनेक सचिव आहेत. त्यांच्याकडे हे सर्व विषय आहेत, असे त्यांनी सांगितले.

मग तुमच्याकडे कोणता विषय येतो असे विचारल्यावर देखील त्यांना आपली जबाबदारी सांगता आली नाही. यावरून त्यांना सरकार करत असलेल्या चांगल्या योजनांविषयी माहिती द्यायची नव्हती की त्यांना माहिती नव्हती! या विषयी आता चर्चा रंगली आहे. ते खरोखरच शासनाने केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आले होती की फक्त देवदर्शन आणि सहलीसाठी म्हणून आले होते, असा प्रश्‍न देखील निमित्ताने समोर आला आहे.

जलसंधारण विभागाच्या सचिवांची ही डोळे झाक!
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. गिरिराज यांच्या सोबत जलसंधारण विभागाचे मुख्य अप्पर सचिव नारायण कराड हे उपस्थित होते. त्यांना जलसंधारण विभागातील कामांविषयी विचारले असता त्यांनीही आपल्या खात्या विषयी काहीच न बोलता मौन बाळगणे पसंत केले. फडणवीस सरकार मधील अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे की, अधिकारीच शासनाची चांगली भूमिका मांडण्याबाबत उदीसनीता दाखवत आहेत हे देखील आता संबंधीत मंत्र्यांनी तपासण्याची वेळ आली आहे.

 

संबंधित लेख