Maharashtra Council Election | Sarkarnama

विधान परिषदेतील एका रिक्त जागेवर 5 जूनला युतीचा झेंडा फडकणार? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 मे 2019

माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या 7 जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत.

मुंबई :  माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या 7 जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी सभापती देशमुख यांचा विधान परिषद सदस्यपदाचा कालावधी 2020 पर्यंत होता. मात्र त्यांच्या निधनाने ही निवडणूक होत आहे. 

विधानसभा सदस्यांच्या मतदानातून या जागेवरील सदस्याची निवड होत आहे. यामुळे शिवसेना- भाजपच्या सध्याच्या संख्याबळात एका जागेने भर पडण्याची शक्‍यता आहे. शिवसेना आणि भाजप युतीचे बळ हे विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीपेक्षा मोठ्या संख्येने जास्त आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोधदेखील होण्याची शक्‍यता आहे. सध्या विधानसभेत भाजप - 123, शिवसेना - 63, कॉंग्रेस - 42 , राष्ट्रवादी कॉंग्रेस - 40 असे बलाबल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांचे अलीकडे निधन झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची एक जागा रिक्‍त झाली आहे. भाजप- शिवसेनेचे एकत्रित बळ 186 होते, तर विरोधकांचे बळ 82 इतके आहे. त्यामुळे युतीसाठी ही जागा जिंकणे अवघड नाही. त्यामुळे विरोधक या जागेसाठी उमेदवार उभा करणार नाहीत, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. 

विधान परिषदेतील पक्षीय बलाबल  

कॉंग्रेस - 17 , राष्ट्रवादी कॉंग्रेस - 16 ,शिवसेना - 12. 
भाजप - 22 , लोकभारती - 1 , शेकाप - 1  पीआरपी (जोंगेद्र कवाडे गट) - 1 राष्ट्रीय समाज पक्ष - 1 , अपक्ष - 6  रिक्‍त - 1 एकूण - 78 
 

संबंधित लेख