Maharashtra Cabinet Expansion PCMC have hopes | Sarkarnama

मंत्रीपद पिंपरीकडे की चिंचवडला : की मावळाला संधी मिळणार?

उत्तम कुटे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

राज्य मंत्रीमंडळात अनेक फेरबदल होणार असून नवीन चेहेऱ्यांना संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता.17) औरंगाबाद येथे सांगितले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा नव्याने उत्साह संचारला आहे. त्यामुळे शहराचा मंत्रीमंडळातील 'बॅकलॉग' भरला जाणार आहे. फक्त हे पद शहरातील भोसरी वा चिंचवडकडे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पिंपरी : राज्य मंत्रीमंडळातील पिंपरी-चिंचवडचा बॅकलॉग भरून निघण्याची शक्यता काल (ता.18) वाढली आहे. त्यामुळे शहरवासियांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्या जोडीने मंत्रीमंडळात समावेश होण्याचा संभव असलेल्या शहरातील भाजपच्या दोन्ही आमदारांच्या समर्थकांतही नव्याने उत्साह संचारला आहे.

त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या निकटच्या वर्तुळातील समजले जाणारे भोसरीचे आमदार महेश  लांडगे यांचे पारडे जड असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.   त्यामुळे पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील दुसरे आमदार (चिंचवड) लक्ष्मण  जगताप यांच्यापेक्षा लांडगे यांचे कार्यकर्ते कालपासून जोरात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्य मंत्रीमंडळात अनेक फेरबदल होणार असून नवीन चेहेऱ्यांना संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता.17) औरंगाबाद येथे सांगितले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा नव्याने उत्साह संचारला आहे. त्यामुळे शहराचा मंत्रीमंडळातील 'बॅकलॉग' भरला जाणार आहे. फक्त हे पद शहरातील भोसरी वा चिंचवडकडे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरातील तीनपैकी वरील दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादीत होते.ऐनवेळी पक्षाचे निष्ठावंत व दोन टर्म आमदार असलेले मावळचे बाळा भेगडे यांना मंत्री करून मुख्यमंत्री आपला 'जोर का धक्का धीरे से' देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातून मावळासह पिंपरी-चिंचवडची मंत्रीपदाची मागणी पूर्ण होणार असल्याने एकाच दगडात ते दोन पक्षी मारू शकतात, असा होरा आहे.

दरम्यान,नवीन आणि तरुण हा मुख्यमंत्र्यांचा निकष ध्यानात घेतला, तर जगतापांच्या तुलनेत पैलवान लांडगे यांचे पारडे राजकीय तज्ज्ञांना भारी वाटत आहे. तसेच ते तुलनेने मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळ आहेत. मुख्यमंत्र्यांचे शहरातील आतापर्यंतचे दोन्ही दौरे लांडगे यांच्या  मतदारसंघातच झाले आहेत. ही बाबही त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. तसेच जगताप हे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची दुसरी जबाबदारी कितपत मिळेल, वा दिली जाईल, याविषयी राजकीय जाणकार साशंक आहेत. हाच निकष भेगडे यांना लावावा, अशी लांडगे अनुयायांची इच्छा आहे. भेगडे हे पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. एकूणच दसऱ्याला सीमोल्लंघन होताना कुणाचे तोरण लागणार हे आता काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

संबंधित लेख