mahamandal state | Sarkarnama

"सीएम'साहेब मंत्रीपद नाही महामंडळ तर द्या !

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अकोला : राज्य मंत्रीमंडळाच्या संभाव्य विस्तारात मंत्री पदावरून संधी हुकण्याची धाकधुक असणाऱ्या भाजपच्या अनेक ज्येष्ठ आणि युवा आमदारांना महामंडळाचे वेध लागले आहेत. मंत्रीमंडळात कदाचित समावेश न झाल्यास किमान महामंडळ तरी पदरात पाडून घेण्यासाठी अनेक आमदार आणि पक्षसंघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या "गॉड फादर'कडे फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. 

अकोला : राज्य मंत्रीमंडळाच्या संभाव्य विस्तारात मंत्री पदावरून संधी हुकण्याची धाकधुक असणाऱ्या भाजपच्या अनेक ज्येष्ठ आणि युवा आमदारांना महामंडळाचे वेध लागले आहेत. मंत्रीमंडळात कदाचित समावेश न झाल्यास किमान महामंडळ तरी पदरात पाडून घेण्यासाठी अनेक आमदार आणि पक्षसंघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या "गॉड फादर'कडे फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. 

गेल्या पंधरा वर्षानंतर देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर वनवास संपेल, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांना होती. मात्र अंतर्गत राजकारणात एकमेकांचे पाय ओढण्यातच धन्यता मानत भाजपचे नेते गुंतल्याने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अद्यापही अच्छे दिन आले नसल्याची ओरड निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून होत असते. कार्यकर्त्यांप्रमाणेच काही ज्येष्ठ आमदारांचीही अशीच अवस्था असल्याने भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. 

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धूळ चारत भाजपने पश्‍चिम विदर्भात दणदणीत विजय मिळविला. राज्य मंत्रीमंडळात ज्येष्ठ आमदारांसह नव्या दमाच्या आमदारांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या आमदारांना बाजूला सारत अकोल्यातून विधानपरिषदेचे आमदार डॉ. रणजित पाटील आणि अमरावतीमधून आमदार प्रविण पोटे पाटील यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लावली. 

ज्येष्ठ असूनही आपला पत्ता कट झाल्याने विधानसभेतील अनेक आमदारांच्या मनात तीव्र असंतोष खदखद होता. या असंतोषाला पक्षाच्या बैठकांसह वरिष्ठ नेत्यांकडे बऱ्याच वेळा मोकळी वाट करून देण्यात आली. त्यानंतरच्या दुसऱ्या विस्तारात वऱ्हाडातून ज्येष्ठ आमदार भाऊसाहेब फुंडकर आणि यवतमाळ जिल्ह्यातून मदन येरावार यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लावण्यात आली. मात्र, त्याही वेळी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणात काही ज्येष्ठ आणि अभ्यासू आमदारांना बाजूला सारण्यात आले. 

राज्य मंत्रीमंडळाचा आता पुन्हा विस्तार होत असल्याने अनेक आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एक तर राज्य मंत्रीमंडळात समावेश अथवा तेही जमले नाही तर किमान महामंडळ तरी पदरात पाडून घेण्यासाठी काही विद्यमान आमदार, माजी आमदारांसह पक्ष संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या "गॉड फादर' कडे फिल्डिंग लावली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

संबंधित लेख