mahadik and patil in kolhapur | Sarkarnama

कोल्हापुरातल्या दोन राजकीय विरोधकांची सामाजिक कामातही तेवढीच इर्षा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : गेली तीन वर्षे गोरगरीबांच्या आयुष्यात दिवाळाच्या सणाचा गोडवा वाढावा म्हणून कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी "माणुसकीची भिंत' नावाचा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी कपडे दान म्हणून घेण्यात येत असून गरजू महिला, पुरुष, लहान मुलांना या कपड्याचे वाटप होत आहे. याच उपक्रमाची प्रेरणा घेवून पाटील यांचे कटटर विरोधक राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनीही "आपुलकीची भिंत' नावाचा उपक्रम सुरु केला आहे. यात महाडिक यांनी हजारो नवीन कपडे ठेवले आहेत. महत्वाचे म्हणजे या दोन्ही भिंतीमध्ये अवघ्या काही फुटाचे अंतर आहे.

कोल्हापूर : गेली तीन वर्षे गोरगरीबांच्या आयुष्यात दिवाळाच्या सणाचा गोडवा वाढावा म्हणून कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी "माणुसकीची भिंत' नावाचा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी कपडे दान म्हणून घेण्यात येत असून गरजू महिला, पुरुष, लहान मुलांना या कपड्याचे वाटप होत आहे. याच उपक्रमाची प्रेरणा घेवून पाटील यांचे कटटर विरोधक राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनीही "आपुलकीची भिंत' नावाचा उपक्रम सुरु केला आहे. यात महाडिक यांनी हजारो नवीन कपडे ठेवले आहेत. महत्वाचे म्हणजे या दोन्ही भिंतीमध्ये अवघ्या काही फुटाचे अंतर आहे. राजकारणात कटटर प्रतिस्पर्धी असलेल्या महाडिक-पाटील यांनी सामाजिक कामात केलेली इर्षा चर्चेचा विषय ठरलीय. 

मागील दोन वर्षापासून आमदार सतेज पाटील यांनी सीपीआर चौकात "माणुसकीची भिंत' नावाचा उपक्रम सुरु केला आहे. "वॉल ऑफ ह्युमॅनिटी' नावाने जगभर हा उपक्रम सुरु आहे. एका व्हॉटसअप ग्रुपवरुन अशा प्रकारे माणुसकीची भिंत सुरु करण्याची चर्चा झाली. या संकल्पनेला मूर्त स्वरुप देण्याचे काम आमदार पाटील यांनी दोन वर्षापूर्वी केले. प्रत्येक माणसात दातृत्वाचा झरा असतो. मात्र त्याला व्यक्‍त होण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. हे व्यासपीठ माणुसकीच्या भिंतीतून उपलब्ध झाले. घराघरातील हजारो अतिरिक्‍त कपडे या माणुसकीच्या भिंतींच्या उपक्रमात आले आणि तेवढेच कपडे वाटलेही गेले. यावर्षी देखील 2 व 3 नोव्हेंबर या कालावधीत माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरु झाला आहे. 

आमदार पाटील यांचे कटटर विरोधक असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना देखील माणुसकीची भिंत ही संकल्पना भावली. त्यांनीही "आपुलकीची भिंत' साकारण्याचा निर्णय घेतला. आणि तेवढ्यावरच न थांबता दसरा चौकातच म्हणजे पाटील यांनी सुरु केलेल्या माणुसकीच्या भिंतीपासून हाकेच्या अंतरावर आपुलकीची भिंत हा उपक्रम सुरु केला आहे. दसरा चौकाच्या विस्तीर्ण मैदानात मंडप घालून नवनवीन कपड्यांचे स्टॉल लावले आहेत. हे कपडे घेण्यासाठी लोकांची दसरा चौकात चांगली गर्दी झाली आहे. दोन परस्पर युवा नेत्यांनी एकच संकल्प,एकाच तारखेला, एकाच ठिकाणावरुन सुरु केला आहे. त्यांच्या राजकीय स्पर्धेबरोबरच सुरु असलेल्या समाजोपयोगी स्पर्धेची चर्चा जिल्ह्यासह राज्यात सर्वदूर पोहोचली आहे. 

संबंधित लेख