mahadev jankar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

सर्वसामान्यांचा "जान'कार मंत्री 

प्रकाश पाटील  
गुरुवार, 1 जून 2017

महादेव जानकरसाहेबांचं बिनधास्त आणि बेधडक वागणं कार्यकर्त्यांना आवडतं आणि भावतंही. गेल्या बुधवारी कार्यकर्त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून जमीनीवर पसरलेला त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून ते सर्वसामान्यांचे "जान'कार मंत्री आहेत असेच अनेक कार्यकर्त्यांचे म्हणणे पडले. 

शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांची पोरं जेंव्हा कार्यकर्ते, नेते असतात तेंव्हा त्यांचे पाय जमिनीवर असतात. पण जेंव्हा ते आमदार, खासदार आणि मंत्री होतात तेंव्हा मात्र ते बदलतात. त्यांची भाषा बदलते, राहणीमान बदलते, जुने मित्र दुरावतात. नव्या मित्रांचे जाळे निर्माण होते. पेज थ्रीच्य कल्चरच्या झगमगाटात ते झळकतात. महाराष्ट्रातील एक मंत्री असा आहे की त्याचे पाय मात्र आजही जमीनवर आहेत. तीच रांगडीभाषा, तोच साधेपणा, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकणं असेल नाही तर त्यांच्या मांडीवर डोक ठेवून सरळ लोळणं असेल. हे सर्व जमते ते पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांनाच. हा माणूस मंत्री आहे असं कुणाला वाटतच नाही. हा "आपला माणूस ' ही भावना केवळ धनगर समाजातीलच नव्हे तर राज्यातील सर्व जातीधर्मातील गोरगरिबांची. 

जानकरसाहेबांचा दौरा असेल. भाषण असेल किंवा गाठीभेटी असतील. ते कधी मनात आडपडदा ठेवून बोलतच नाहीत. रोखठोकपणा त्यांच्या रक्तातच. आपण मंत्री आहोत म्हणून प्रत्येक गोष्टीत प्रोटोकॉल पाळणे त्यांना जमत नाही. काय लेका ? काय मर्दा ? कशाला आला ? काम होणार नाही ? मुंबईत कशाला येताया ? अशा एक ना अनेक गोष्टी बेधडक बोलून कार्यकर्त्यांची प्रसंगी नाराजी ओढावून घेणाऱ्या या माणसाचे मन मात्र मेणाहून मऊ ! गोरगरिबांसाठी तर हा माणूस सतत तळमळत असतो. आपण मंत्री आहोत त्यामुळे जरा जपून बोलले पाहिजे. वागले पाहिजे हे त्यांना जमत नाही. जेथे जातील तेथे ते माणसात रमतात. 

काल (बुधवारी) मुंबईत अहल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जानकरसाहेबांनी कार्यकर्त्यांसोबत गप्पांचा फड रंगविला. गप्पा मारतच हातात जेवनाचं ताट घेऊन सुखदु:खाच्या गोष्टीतही ते रमले. जमीनीवर बैठक मारलेल्या कार्यकर्त्यांच्या घोळक्‍यात ते घुसले. तेथेच बैठक मारली. बसून कंटाळा आला म्हणून थेट एका कार्यकर्त्याच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत पसरले. हा सर्व अनुभव कार्यकर्ते आणि अधिकारीही घेत होते. या माणसाला आपण मंत्री असल्याचे भानही राहिले नाही. त्यांना माहीत असावे मंत्रीपद काय आज आहे उद्या नाही. पण कार्यकर्त्यांचं जे कवचकुंडल आहे ते जन्मभर साथ देणारं आहे. गोरगरिब आणि सामान्य कार्यकर्ते आपणास कधीच विसरणार नाही हीच जाणीव त्यांना आहे. 

जानकरसाहेबांचं हे बिनधास्त आणि बेधडक वागणं कार्यकर्त्यांना आवडतं आणि भावतंही. कार्यकर्ते कितीही रागवले आणि रूसले तरी त्यांचा चेहरा पाहिला की लोक मागचं विसरून त्यांच्या सावलीतच उभं राहणं पसंत करतात. आज मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत पण, असा मंत्री पाहिला नाही. गेल्या बुधवारी कार्यकर्त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पसरलेल्या आणि कार्यकर्त्यांसोबत भाजीभाकरी खाणाऱ्या जानकरसाहेबांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सागर नावाच्या एका कार्यकर्त्यांने एक खूप सुंदर पोस्ट टाकली आहे. तो म्हणतो, ""सामान्य माणसांनी आणलेली भाजीभाकरी त्यांच्यासोबत खाणारा पहिला कॅबिनेट मंत्री आम्ही पाहिला.'' 

जानकरसाहेब जरी मंत्री बनले असले तरी त्यांच्या डोक्‍यात मंत्रीपदाची किंवा सत्तेची हवा गेली नाही. ते सर्वसामान्यांचे "जान'कार मंत्री आहेत असे म्हणावे लागेल. 

फोटो फीचर

संबंधित लेख