mahadeo jankar | Sarkarnama

धनगर आरक्षणाच्या मुद्यावर मंत्री झालेलो नाही : महादेव जानकर 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात समेट घडवण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच बैठक घेतली. खासदार राजू शेट्टींच्या कोल्हापूर येथील मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठीदेखील मीच सदाभाऊ खोत यांना जाण्यास सांगितले. शासन तुमच्यामध्ये भांडण लावणार, त्यावर किती भांडायचे हे तुमीच ठरवा. 
- महादेव जानकर, पशुसंवर्धनमंत्री 

पंढरपूर : बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाने मला मतदान कमी दिले. मात्र ब्राम्हण व मराठा समाजाने जास्त मतदान दिले. जर धनगर समाजाने भरघोस मतदान दिले असते, तर राज्याऐवजी केंद्रात मंत्री झालो असतो, असे विधान राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले, तसेच धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आपण मंत्री झालो नसल्याचे त्यांनी सांगितले. 

मंत्री जानकर शनिवारी श्री विठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना धनगर समाजाबद्दलची राजकीय खंत व्यक्त केली. जानकर म्हणाले, बारामती लोकसभा मतदार संघात ज्या गावांमध्ये धनगर समाज संख्येने जास्त आहे. त्या गावांमध्ये मला मतदान कमी झाले. तर याउलट ब्राम्हण आणि मराठा समाजाची जास्त संख्येने मते मिळाली. जर मला धनगर समाजाने आपला माणूस म्हणून मते दिली असती तर मी राज्याऐवजी केंद्रात मंत्री झालो असतो. 

धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका मवाळ झाली आहे का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, धनगर व मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. मी फक्‍त धनगर समाजाचा नेता नाही. पक्ष चालवताना सर्व समाजाला बरोबर घेऊन चालावे लागते. एक़ा जातीवर पक्ष चालत नसतो. राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार म्हणून मराठा आहे. पक्ष चालवणे आता सोपे राहिले नाही. 

सेना भाजप धुसफूसी बद्दल विचारले असते ते म्हणाले, राज्यातील युतीचे सरकार टिकावे यासाठी मी स्वतः उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही पाय धरण्यास तयार आहे. 

 

संबंधित लेख