Mahadeo Janakar and Athwale are lucky | Sarkarnama

`महादेव जानकर आणि रामदास आठवले हे दोघेच नशिबवान' 

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

महादेव जानकर आज बारामतीत आले.  त्यांनी व्हिआयपी कल्चर बाजूला ठेवून हातात ताट घेऊन कार्यकर्त्यांसमवेत उभे राहून जेवले. एक लाख लोकांच्या घरी असेच जेवलो असे म्हणत त्यांनी बारामतीत येऊन मुंडेसाहेब आणि पवारसाहेबांचे पक्ष चालविण्याचे कौशल्य असल्याचे सांगत दाद दिली. 

बारामती ः ""या राज्यात जर कोणी नशिबवान असेल तर आम्ही दोघेच, म्हणजे मी व रामदास आठवले! माझ्या पक्षाचे दोनच आमदार असूनही मला मंत्रीपद, रामदास आठवले तर अधिक नशिबवान! का? तर त्यांच्या तर पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही, तरीही ते देशात महत्वाच्या खात्यावर मंत्री आहेत. अर्थात माझ्या बाबतीतील हे "क्रेडीट गोज टु देवेंद्र फडणवीस!','' अशा शब्दांत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी आपले राजकीय यश बोलून दाखविले. 

बारामतीतील विभागीय मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, ""फडणवीस यांना माहिती आहे की आम्ही दुसऱ्यांचे झेंडे धरणारे नाही. आम्ही दोघांनी आमही आमच्या कष्टाने पक्ष बांधले. आमच्या पाठीशी जनता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आम्हाला लाल दिवा दिला.'' 

महादेव जानकर म्हटले की, काहीतरी सणसणीत वक्तव्य मिळेल अशा अपेक्षेने आज पत्रकार थांबले होते, त्यात धनंजय मुंडे व जानकर हे दोघे आज बारामतीत एकत्र आले होते. मात्र जानकर आले आणि त्यांनी व्हिआयपी कल्चर बाजूला ठेवून हातात ताट घेऊन कार्यकर्त्यांसमवेत उभे राहून जेवले. एक लाख लोकांच्या घरी असेच जेवलो असे म्हणत त्यांनी बारामतीत येऊन मुंडेसाहेब आणि पवारसाहेबांचे पक्ष चालविण्याचे कौशल्य असल्याचे सांगत दाद दिली. 

बारामतीत विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने आलेल्या जानकर यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर आज छाप पाडली. मात्र "लंबी रेस का घोडा बनायचे'य असे भाषणात सांगणाऱ्या जानकर यांनी वादग्रस्त वक्तव्य तोंडूनही निघणार नाही याची काळजी घेतली. जानकर दुपारी साडेबारा वाजता आले. थेट कार्यकर्ते जिथे भोजन करीत होते. तिकडे गेले. हातात पत्रावळी घेतली. उभे राहूनच कार्यकर्त्यांशी संवाद करीत एका एका कार्यकर्त्याकडे जात त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. 

त्यानंतर पदाधिकारी मेळाव्यात बोलताना आपला प्रवास सांगताना काशिराम यांनी माझ्या पक्षाची नोंदणी केली, त्याचे पैसेही त्यांनीच भरले असे सांगताना 25 वर्षापूर्वी एकटाच होतो. मात्र पक्ष सुरू करायचा, वाढवायचा हे खूप अवघड काम असते, असे मनमोकळेपणाने मत व्यक्त केले. 

ते म्हणाले, ""पवारसाहेब, मुंडेसाहेबांनी पक्ष चालविताना महाराष्ट्र माहिती करून घेतला. मात्र त्यानंतर मीच आहे. मी देखील महाराष्ट्रातील गाव न गाव ओळखतो. राज्यातील साडेआठ लाख कुटुंबांच्या घरी मी जेवलो. दहा लाख कार्यकर्त्यांच्या घरी चहा घेतला असेल. सुरवातीला लोक हसायचे, मात्र एकीकडे 14 आमदारांवरील मनसे एका आमदारावर आली आणि आम्ही दोनवर पोचलो. हे विसरता येणार नाही.'' 
 

संबंधित लेख