mahaarati in aurangabad | Sarkarnama

औरंगाबादमध्ये दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांकडून स्वतंत्रपणे महाआरती

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

औरंगाबाद : केंद्र, राज्य आणि शहाराच्या महापालिकेतही एकत्रितपणे सत्ता भोगत असलेल्या शिवसेना-भाजपमधील दरी कायम असल्याचे चित्र सहा डिसेंबर निमित्त केलेल्या महाआरतीच्या आयोजनावरून स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने सुपारी हनुमान मंदिरा समोर भगव्या दिनानिमित्त महाआरती व भजन केले. तर याचवेळी भाजपने संस्थान गणपती मंदीरात महाआरती केली. सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्याचे पडसाद आजच्या महाआरतीत देखील दिसून आले. 

पंचवीस वर्षापुर्वी सहा डिसेंबरला आयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली होती. शिवसेनेच्या वतीने हा दिवस "भगवा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दरवर्षी शहरात महाआरती व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सुरूवातीची काही वर्ष शिवसेना-भाजप एकत्रितपणे महाआरती करायचे. पण राज्य व केंद्राच्या सत्तेत असून देखील शिवसेनेने सातत्याने भाजपवर टीका करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये एक प्रकारची दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

केंद्र व राज्यातील प्रत्येक घटनेचे पडसाद स्थानिक राजकारणात देखील अनेकदा उमटतांना दिसले. औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप सत्तेत आहे. परंतु अनेक मुद्यांवरून हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे पहायला मिळते. समांतर आणि आताच्या गंगा-गोदावरी पेयजल योजना, कचराकोंडीचा प्रश्‍न, शहरातील बिघडलेले पाण्याचे वेळापत्रक, शंभर कोटीच्या रस्त्याची कामे आदी अनेक विषयांवर सभागृहात शिवसेना-भाजपमध्ये खटके उडाले. शहरात उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी देखील भाजपच्या भूमिकेवरून शिवसेनेने तोफ डागली होती. त्यामुळे अनेकदा शहराच्या राजकारणात युती असूनही या दोन्ही पक्षांचे धोरण एकला चलो रे चे राहिले आहे. 

नेत्यांची जवळीक, कार्यकर्ते मात्र दूर दूर.. 
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकाच्या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ नेत्यांमधील दुरावा काही प्रमाणात कमी होऊन जवळीक निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नुकतेच विदर्भात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. दोघांनीही एकमेकांवर स्तुती सुमने उधळत सोबत नगारा वाजवल्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जवळीक वाढत असतांना कार्यकर्ते मात्र दूर दूरच असल्याचे चित्र भगवा दिनानिमित्त आयोजित महाआरती व इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने औरंगाबादेत पहायला मिळाले. 

संबंधित लेख