जे मफलरने गळा आवळायला निघाले होते त्यांचे मनपरिवर्तन झाले ? 

राजकारणात दणाणणारी मुलुखमैदानी तोफ आज तुरुंगात आहे. ही तोफ बाहेर यावी असे या तोफेच्या समर्थकांना वाटते. पण, जे राज ठाकरे मफलरने छगन भुजबळांचा गळा आवळायला निघाले होते. त्यांचेही आज मनपरिवर्तन झाले असे म्हणावे का ?
जे मफलरने गळा आवळायला निघाले होते त्यांचे मनपरिवर्तन झाले ? 

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मोठे नेते. त्यांच्याविषयी सर्वांनाच सहानुभूती. गेल्या दोन वर्षापासून ते गैरव्यवहाराच्या आरोपामुळे तुरुंगात आहेत. ते अद्याप बाहेर आले नाहीत. ते बाहेर यायला हवेत यासाठी त्यांचे समर्थक धडपडत आहेत. भुजबळ हे राजकारणाचे बळी आहेत असेही त्यांना वाटते. 

भुजबळ असे नेते आहेत की त्यांच्यावर केवळ राष्ट्रवादीतच नव्हे तर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसमधील कार्यकर्तेही प्रेम करतात. एकेकाळी शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून ते ओळखले जात. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून कॉंग्रेस त्यानंतर राष्ट्रवादीत दाखल झालेला हा नेता नेहमीच आक्रमकच राहिला. भुजबळ यांचे गोपीनाथ मुंडे हे ही एक जिवलग मित्र होते. त्यांनी ओबीसींचीही व्होटबॅंक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुंडेंच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रात काही सभा संमेलनेही घेतली. जहाल हिंदुत्त्वाकडून पुरोगामीत्वाकडे वळलेला हा नेता भ्रष्टाचाराच्या गाळात केव्हा अडकला हेच कळले नाही. त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. 

दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि हवालाप्रकणात त्यांना अटक झाली ती फडणवीस सरकारच्या काळात. ते आज सुटतील उद्या सुटतील असे म्हणता म्हणता दोन तीन वर्षे निघून गेली. राज्याच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्त्व चार भिंतीच्या आड बंदिस्त आहे. हे वादळ जर बाहेर आले तर ते घोंघावणार याची भीती त्यांच्या विरोधकांनाही वाटत असावी.

भुजबळ हे  शिवसेनेत असताना केलेल्या वक्तव्यांमुळे काही वेळा अडचणीत आले. मग मुंबईतील हुतात्मा स्मारक गोमुत्रांने धुवून काढणे असेल किंवा गांधीजींच्या पुतळ्याबाबतचे वादग्रस्त विधान असेल. या विधानांमुळे त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. सभा, संमेलने, आंदोलनामुळे ते काही वेळा तुरुंगातही गेले. मात्र भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर कधी झाला नाही. 

आयुष्याची साठी ओलांडल्यानंतर आपणास तुरुंगात जावे लागेल असा विचारही त्यांच्या कधी मनात आला नसेल. राजकारणात सर्व दिवस सारखे नसतात. चढउतार येतात. नेहमीच झगमगाटात राहणारा हा नेता तुरुंगात खितपत पडला आहे. ते केव्हा सुटणार हे काही सांगता येत नाही. मात्र त्यांचे समर्थक मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटले. भुजबळांच्या मागे त्यांनी राहावे यासाठी त्यांना साकडेही घातले. 

आता राज हे भुजबळांविषयी कोणती भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे. ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास समर्थकांना आहे. भुजबळ बाहेर येण्यासाठी आंदोलन करण्याचा  इशारा समर्थकांनी दिला आहे. या आंदोलनात मनसे उतरणार का ? हा ही प्रश्‍न आहेच. मात्र भुजबळ आणि राज ही राजकारणातील दोन टोके आहेत. 

आज जे समर्थक राजना साकडे घालता आहेत तेच राज भुजबळांचा मफलरने गळा आवळायला निघाले होते, याचा विसर भुजबळांच्या समर्थकांना पडला आहे का ? राज यांनी जाहीरसभेत भुजबळांचा केलेला पाणउतारा त्यावेळी कोणालाच रुचला नव्हता. राज यांनी अशापद्धतीने टीका भुजबळांवर करायला नको होती असा सूर त्यावेळी निघाला होता. भुजबळांवरील टीकेला कारणही नाशिकचे राजकारण होते. तरीही राज यांची सभा नाशिकमध्ये असो की मुंबईत त्यांनी भुजबळांना लक्ष्य केले नाही असे कधी झाले नाही. भुजबळ हे राज यांच्या नेहमीच अजेंड्यावर राहिलेले नेते आहेत. 

आज विरोधीबाकावर जसे आर.आर.आबा पाटील हवे होते तसे भुजबळही असायला हवे असे आजही लोकांना वाटते. सत्ताधारी किंवा विरोधकांवर कसे तुटून पडावे हे भुजबळांकडे पाहिल्यानंतरच कळते. अशी मुलुखमैदानी तोफ तुरुंगात आहे. ही तोफ बाहेर यावेत यासाठी त्यांचे समर्थक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. पण, भुजबळांना कायद्याप्रमाणे अटक झाली आहे. त्यांच्यावर झालेले आरोप जेव्हा सिद्ध होणार नाहीत तेव्हाच ते बाहेर येऊ शकतील. त्यामुळे राज काय किंवा इतर कुठलाही नेता त्यांना कसे बाहेर काढणार ? भुजबळांवर अन्याय होत आहे याचा निषेध किंवा आंदोलन करण्याचा त्यांच्या समर्थकांना अधिकार आहे. तरीही भुजबळप्रकरण राज कशापद्धतीने हातात घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

ज्यावेळी छगन भुजबळ हे शिवसेनेत होते त्यावेळी राज हे त्यांना ज्युनिअर होते. आज राज आणि भुजबळ दोघेही शिवसेनेत नाहीत. भुजबळांचा पक्ष वेगळा. राजकारणात आरोपप्रत्यारोप होत असतात. राज यांनीही भुजबळांना कधी सुटी दिली नाही.

 राज आज भुजबळ सुटले पाहिजेत असे म्हणत आहेत. म्हणजेच त्यांच्या मनात भुजबळांविषयी कटुता राहिलेली दिसत नाही. भुजबळांवर एकेकाळी तुटून पडणाऱ्या राजसाहेबांचे मनपरिवर्तन झाले असे म्हणावे का ? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com