मिसाळांना अडचण उमेदवारीची नाहीच, आव्हान कॉंग्रेस आघाडीचेच

मिसाळांना अडचण उमेदवारीची नाहीच, आव्हान कॉंग्रेस आघाडीचेच

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातून मागील सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांचे मतदारसंघातील काम आणि संघटन मजबूत आहे. महापालिकेतील सध्याचे सभागृह नेते श्रीमाथ भिमाले वगळता पक्षातून फारसे कुणी इच्छुकही नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्यात मिसाळ यांना अडचण दिसत नाही. उमेदवारी मिळाली तरी कॉंग्रेस आघाडीमुळे निवडून येण्याचे आव्हान मात्र मिसाळ यांच्यापुढे आहे. 

राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश होण्यासाठी आमदार मिसाळ यांचे नाव चर्चेत आघाडीवर होते. मात्र त्यानंतर लगेचच मुंबई महापालिकेची निवडणूक होती. त्या पार्श्‍वभूमीवर मिसाळ यांच्याऐवजी मुंबईतील उत्तर भारतीय विद्या ठाकूर यांना संधी देण्यात आली. गेल्या साडेतीन-चार वर्षात मिसाळ यांनी मतदारसंघावरील पकड मजबूत ठेवली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना मोठा प्रतिस्पर्धी दिसत नाही. 

महापालिकेतील सभागृह नेते भिमाले इच्छुक आहेत. मात्र महापालिकेतील महत्वाचे पद त्यांच्याकडे असल्याने त्यांना पक्षाकडे फार आग्रह धरता येणार नाही. मिसाळ यांच्या तुलनेत त्यांची ताकदही कमी आहे. त्यामुळे भिमाले स्वत:देखील किती आग्रही राहतील याबाबत शंका आहे. भिमाले यांच्याबरोबरच ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे, राजेंद्र शिळीमकर हेदेखील इच्छुक आहेत. मात्र यांच्यातील फार आग्रही कुणी राहतील, असे वाटत नाही. परिणामी आमदार मिसाळ यांना उमेदवारीची अडचण येण्याची शक्‍यता नाही. महापालिका निवडणुकीत पर्वती मतदारसंघाची कामगिरीदेखील सर्वाच चांगली राहिली आहे. 

भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक नगरसेवक या मतदारसंघातून निवडून आले आहे आहेत. या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत आमदार मिसाळ यांच्या समोरील आव्हाने मात्र वेगळी आहेत. गेल्या चार वर्षात परिस्थिती बदलली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात काही प्रमाणात वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण कसे बदलणार यावर आमदार मिसाळ यांचे यश अवलंबून आहे. 

आमदारकीच्या आधी पुणे महापालिकेत 2007 मध्ये नगरसेविका म्हणून मिसाळ यांनी काम केले आहे. विद्या सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्ष होत्या, आता उद्यम विकास बॅंकेच्या त्या विद्यमान संचालक आहेत. या दोन्ही बॅंकांच्या माध्यमातून त्यांनी काम उभे केले आहे. अनेकांना मदत केली आहे. शिवाय मतदारसंघातील प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. दीपक उर्फ बाबा मिसाळ हे पक्षाचे सरचिटणीस आहेत. त्यांचा या साऱ्या मतदारसंघात दबदबा आहे. आमदार मिसाळ यांची सारी निवडणूक यंत्रणा बाबा मिसाळ हाताळत असतात. विरोधकांचा विचार करायचा झाल्यास शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. गेल्या वेळीदेखील शिवसेना स्वतंत्र लढली होती. यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढली तर दोन्ही कॉंग्रेसचे आव्हान निश्‍चितपणे राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com