madhukar pichad criticise anna dange | Sarkarnama

आण्णा डांगे आदिवासींचे वकिल केव्हापासून झाले? : मधुकर पिचड 

संपत देवगिरे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

राज्य घटनेत आदिवासी मुलभूत निर्णय घेण्याचा अधिकार ज्या त्या राज्यातील आदिवासी सल्लागार समितीला दिला आहे. ही समिती राज्याचे राज्यपाल नियुक्त करताता. मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. सर्व आमदार व खासदार त्याचे सदस्य असतात. त्यामुळे असा काही विषय असल्यास सरकार आमच्याशी चर्चा करेल. काही लोक सरकारवर दबावासाठी असे राजकारण करतात. 
- मधुकर पिचड, आदिवासी नेते, माजी मंत्री 

नाशिक : "अण्णा डांगे केव्हा आदिवासी झालेत? ते कशाला आमची उठाठेव करीत आहेत. त्यांनी आदिवासींची वकिली करणे बंद करावे. राज्यातील सर्व आदिवासी आमदार, खासदारांना समाजाचे हित कळते. ते समर्थ आहेत. राज्य शासनावर दडपणासाठी कोणी काहीही विधाने करु नयेत', असा इशारा ज्येष्ठ आदिवासी नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अण्णा डांगे यांना दिला आहे. 

सांगलीत काल धनगर आरक्षणासाठी अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी बोलताना धनगर समाजाला आरक्षण द्याल तर आम्ही पाठींबा काढून घेऊ अशी भूमिका आदिवसी आमदारांनी घेतल्याचे विधान अण्णा डांगे यांनी केले होते. 

याविषयी श्री. पिचड म्हणाले, हे सांगणारे अण्णा डांगे कोण? डांगे आमच्या आमदारांचे पुढारी केव्हा झाले? डांगे कधी आदिवासी झाले. त्यामुळे बिगर आदिवासी आणि खोटे आदिवासींनी आदिवासींची वकिली करण्याचे काहीही कारण नाही. उगाच सरकारला बिचकावण्यासाठी काहीही बातम्या देऊ नये. आदिवासींच्या हिताचा काय निर्णय करायचा हे राज्यातील सर्व चोविस आदिवासी आमदार आणि सहा खासदार एकत्र बसून ठरवू. आमची उठाठेव करण्याची बाहेरच्या लोकांनी करु नये. राज्यातील सर्व आदिवासी या प्रश्‍नावर एकत्र आहेत. आमचे हित आम्हाला कळते. वेळ आल्यावर निर्णय घेऊ. आजी, माजी सर्व आमदार या प्रश्‍नावर एक आहोत. सरकारवर दबाव आणण्याचे आज काहीच कारण नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख