madha ncp ticket issue | Sarkarnama

कोल्हापूर, सातारा सुटले; माढा लटकले!

प्रमोद बोडके, सोलापूर 
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

2019 ची लोकसभा निवडणूक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या इच्छुक उमेदवारांना जनमानसात उतरविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या जागांपैकी कोल्हापूर, सातारा, माढा या मतदार संघात अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी कायम होती. दोन्ही गटाला समोरासमोर करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर आणि साताऱ्यातील मनभेद दूर केले आहेत. माढा लोकसभा मतदार संघातील ना मतभेद मिटले ना मनभेद. विद्यमान खासदार असतानाही इच्छुकाच्या चकरा माढ्यात वाढल्याने उमेदवारीचा संभ्रम कायम आहे.  

कोल्हापुरात खासदार धनंजय महाडीक आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यात असलेले मतभेद मिटले आहेत. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात असलेले मतभेद दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन्ही उमेदवारांचा 2019 मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा मार्ग अद्यापही मोकळा झाल्याचे दिसत नाही. 

मोहिते-पाटील समर्थक व आमदार बबनदादा शिंदे समर्थक, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे समर्थक, करमाळ्यातील बागल समर्थक यांच्यातील मतभेद आणि मनभेद आजही कायम आहेत.  

माढ्याची खासदारकी मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे असतानाही निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा माढा लोकसभा मतदार संघातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला तालुक्‍यात संपर्क वाढला आहे. विद्यमान खासदार असतानाही इच्छुक देशमुख यांच्या माढ्यात चकरा वाढू लागल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची व मोहिते-पाटील समर्थकांची अस्वस्थता वाढू लागली आहे. 

निवडणुका जसजशा जवळ येथील तसतसा माढ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्‍न जटिल होऊ लागला आहे. देशमुख यांनी जरी माढ्यात संपर्क वाढविला असला तरीही त्या ज्या भागाचे नेतृत्व करतात त्या भागातील फक्त दोनच विधानसभा मतदार संघाचा समावेश माढ्यात आहे. उर्वरित चार विधानसभा मतदार संघ सोलापूर जिल्ह्यातील आहेत. देशमुख यांची उमेदवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जरी स्वीकारली तरीही सोलापूर जिल्ह्यातील चार मतदार संघातील सर्वसामान्य जनता मात्र देशमुखांची उमेदवारी स्वीकारण्याबाबत साशंक आहे. 
 

संबंधित लेख