madan bhosale offer from bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

प्रतापराव भोसलेंच्या पुत्राला भाजपची ऑफर! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 जुलै 2017

किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले हे कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे पुत्र आहेत. ते सातारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षही होते. वाई मतदारसंघातून अपक्ष आमदार होते. 2014 ची निवडणूक कॉंग्रेसकडून लढविली, मात्र त्यांचा पराभव झाला. या मतदारसंघात निवडून येईल, असा भाजपकडे उमेदवार नाही. त्यामुळे भाजप मदन भोसले यांच्याकडे लक्ष ठेऊन आहे. 
 

 भुईंज (जि. सातारा) : सहकारी संस्थांचा राजकारणासाठी वापर होत असून त्यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. सामान्य शेतकऱ्यांचा सहकारी संस्थांवरचा उडालेला विश्‍वास पुनर्स्थापित करायचा आहे. त्यासाठी मदनदादा भोसले यांच्यासारख्या सहकारातील नेतृत्वाच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे, असे मत सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाषराव देशमुख यांनी व्यक्त करत थेट मदनदादांना भाजपमध्ये येण्याची ऑफरच दिली. 

वाई येथील एका कार्यक्रमासाठी आलेल्या श्री. देशमुख यांनी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, स्मितादेवी देशमुख, मोहनराव भोसले, डॉ. सुरभि भोसले, जिजाबा पवार, अविनाश फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

देशमुख म्हणाले, जिल्हा बॅंका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, ग्रामीण भागातील सहकारी सोसायट्या या शेतकरी विकासाच्या महत्वाच्या संस्था आहेत. या सहकारी संस्थांचा वापर राजकारणासाठी होत असून त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. या संस्था शेतकऱ्यांना आपल्या वाटल्या पाहिजेत. त्या सक्षम झाल्या पाहिजेत. सर्वसामान्य शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली असून त्यांना न्याय देण्यासाठी सहकारात अमुलाग्र बदल केले जात आहेत. सामान्य शेतकऱ्यांचा सहकारी संस्थांवरचा उडालेला विश्‍वास पुनर्स्थापित करायचा आहे. त्यासाठी मदनदादा भोसले यांच्यासारख्या सहकारातील नेतृत्वाच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. नेतृत्व जर विधायक-रचनात्मक व दूरदृष्टीचे असेल तर एखाद्या संस्थेचा सर्वांगिण विकास कसा होतो याचे किसन वीर उद्योग समुह हे उत्तम उदाहरण आहे. किसन वीरची विस्कटलेली घडी सावरून, प्रतापगड लिलावापासून वाचवून आणि खंडाळा कारखाना उभारण्याबरोबर या नेतृत्वाने उभारलेले पुरक उद्योग व विधायक उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे नमुद केले. सभासद शेतकऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी किसन वीर कारखान्यावर सुसज्ज हॉस्पिटल उभारावे अशी सूचनाही त्यांनी केली. 

प्रास्ताविकात मदनदादा भोसले यांनी नामदार देशमुख यांच्या कारकिर्दीत राज्यातील सहकार सुरक्षित रहावा, वाढीस लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत करून आभार मानले. दत्तात्रय शेवते यांनी सुत्रसंचालन केले. 

 

संबंधित लेख