मोदी सरकार पुन्हा आल्याने आणि भामरे खासदार झाल्याने गावाला पुरणपोळीचे जेवण!

मोदी सरकार पुन्हा आल्याने आणि भामरे खासदार झाल्याने गावाला पुरणपोळीचे जेवण!

धुळे : आपला आवडता पक्ष, नेता निवडणुकीत विजयी व्हावा किंवा विजयी झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प कार्यकर्ते किंवा समर्थकांकडून सोडले जातात. असाच पुरणपोळी, आमरसाचे गावजेवण देण्याचा संकल्प डाबली- धांदरणे (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी भावराव झिपा सूर्यवंशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे पुन्हा विजयी झाल्याने शनिवारी सोडला.

दोन क्विंटल गहू आणि दोन क्विंटल डाळीमधील पुरणपोळी, आमरसाच्या जेवणासाठी या गावात सकाळनंतर जत्राच भरली. सुमारे पाच हजार ग्रामस्थांनी या जेवणाचा आस्वाद घेतला. 

शेतीवर आधारित डाबली- धांदरणेची सुमारे हजार- दीड हजाराची लोकवस्ती. यात शेतकरी कुटुंब असलेल्या जवळपास सरासरी 80 ते 90 टक्के मतदारांनी भाजपला मतदान केले. कॉंग्रेस उमेदवाराला केवळ 54 मते पडली. अनेक वर्षे हे गाव दुर्लक्षित राहिले. मात्र, केंद्र आणि राज्यात भाजप सरकार आले आणि रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी परिसरात विकासाची अनेक कामे केली.

सुलवाडे- जामफळसारखा 50 वर्षांपासून प्रलंबित उपसा सिंचन योजनेचा प्रकल्प मार्गी लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी व्हावा, ही ग्रामस्थांची मनोमन इच्छा होती. ती पूर्ण झाल्याने आनंद व्यक्त करण्यासाठी आमरस, पुरणपोळीची मेजवानी पंचक्रोशीतील गावांना दिल्याची माहिती श्री. सूर्यवंशी, कमल भावराव सूर्यवंशी यांनी दिली. 

गावाला जत्रेचे स्वरूप 

देशात पुन्हा मोदी सरकार, तसेच मोदी, डॉ. भामरे यांच्या दुसऱ्यांदा विजयाच्या आनंदात डाबली- धांदरणेला या उपक्रमामुळे गाव जत्रेचे स्वरूप आले. नवनिर्वाचीत खासदार डॉ. भामरे, मंत्री रावल हे दिल्लीत असल्याने या मेजवानीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी मोबाईलव्दारे शेतकरी सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे प्रतिनिधी म्हणून रोहन सुभाष भामरे, पुतणी इंद्रायणी सुरेश भामरे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा संजीवनी शिसोदे, संजय शिसोदे उपस्थित होते. श्री. सूर्यवंशी यांच्याकडे घरभरणीचा छोटेखानी कार्यक्रम होता. पण त्यात त्यांनी आमरस, पुरणपोळीच्या मेजवानीचा संकल्पही सोडला. आता शिंदखेडा तालुक्‍याच्या स्वप्नातील जामफळ धरण पूर्ण होऊन शेताच्या बांधापर्यत पाणी येणार असल्याने शेतकरीही सुखावणार आहे. मनमाड- इंदूर रेल्वे मार्गही पूर्ण होणार असल्याने परिसराचा कायापालट होण्याची खात्री डाबली- धांदरणेमधील ग्रामस्थांना आहे.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डाबलीचे सरपंच राजेंद्र पाटील, धांदरणेचे सरपंच केशरसिंग गिरासे, नंदकुमार संकलेचा, सुरेश पाटील, आधार गिरासे, रवींद्र गिरासे, जयसिंग गिरासे, मधुकर पाटील आदींनी सहकार्य केले. 

भामरे, शिसोदेंकडून आभार 

रोहन भामरे यांनी सांगितले, की वडील डॉ. सुभाष भामरे यांना दोन्ही गावांनी भरघोस मतदान केले. त्याबद्दल आभारी आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी अर्पण केले आहे. सेवा हाच त्याचा धर्म आहे. त्यांना जनतेने कायम पाठबळ द्यावे. संजीवनी शिसोदे म्हणाल्या, की डॉ. भामरे यांचा विजय ही त्यांचा कामाची पावती आहे. मोदी सरकार, मंत्री जयकुमार रावल यांच्यावर जनतेने दाखविलेला विश्‍वास विजयात रूपांतरित झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री रावल यांचा विजय निश्‍चित आहे. डाबली- धांदरणेने अशी साथ कायम ठेवावी. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com