Lost hope of becoming Minister - Mete | Sarkarnama

मंत्रीपदाची आशा सोडली - विनायक मेटे

दत्ता देशमुख- सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

तरुणपणात लग्न आणि मुल झाल्याचा आनंद वेगळा असतो असे मिश्‍किलपणे सांगत त्यांनी स्वःताच्याच दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.

बीड :गेल्या तेवीस वर्षांपासून सत्तेच्या पालखीचे भोई असलेल्या आणि वारंवार मंत्रीपदाने हुलाकवणी दिलेल्या शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, छत्रपती शिवीजा महाराज अरबी समुद्र स्मारक समितेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी अखेर आपण मंत्रीपदाची आशा सोडल्याचे जाहीर करुन टाकले.

तरुणपणात लग्न आणि मुल झाल्याचा आनंद वेगळा असतो असे मिश्‍किलपणे सांगत त्यांनी स्वःताच्याच दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.

मराठा आरक्षणा संदर्भात शिवसंग्रामची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते. मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या मेटे यांना सुरुवातीलाच पत्रकारांनी या संदर्भात छेडले. तेव्हा मंत्रीमंडळ विस्तार हा पुर्णपणे मुख्यमंत्र्याच्या अधिकारातला विषय असून
आपण त्यात हस्तक्षेप करणार नाही असे सांगत आपल्याला मंत्रीपद मिळण्याची शक्‍यता नसल्याचेच अधोरेखित केले. जूनमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराची शक्‍यता नाही. त्यानंतर लगेच
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होईल त्यामुळे या काळात देखील मंत्रीमंडळ विस्तार अशक्‍य असल्याचे मेटे यांनी नमूद केले.

औट घटकेचे मंत्रीपद नको

पावसाळी अधिवेशनानंतर राज्यातील युती सरकारला तीन वर्ष पुर्ण होतील.त्यानंतर जरी विस्तार झाला आणि संधी मिळाली तर खाते समजून घेण्यातच सहामहिने जातील. पंतप्रधान मोदींनी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितघेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. त्यामुळे तसे झाले तर सहा महिने आधीच
विधानसभेच्या निवडणुका होतील. म्हणेज पाच वर्षापैकी सहा महिने एकत्रितनिवडणुकीमुळे आणि सहा  महिने  आचारसंहितेमुळे  असा एक वर्षाचा कालावधी जाईल.नशिबाने मंत्रीपद मिळाले तरी सहा महिन्यापेक्षा जास्तकाळ काम करता येणार नाही. मंत्रीपदाच्या शर्यतीत सकाळी चर्चेत असलेले नाव सायंकाळी गायब होते. त्यामुळे मंत्रीपद नशिबाने मिळाले आणि नाही मिळाले तरी फार फरक पडणार नाही असा निराशेचा सूर देखील मेटे यांनी यावेळी काढला.

मेटेंच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या मध्यस्थीने आमदार मेटे भाजप सोबत गेले. विधानसभा निवडणुकीवेळी शिवसंग्रामसह स्वाभिमानी शेतकरी आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत वाटा देण्याचा शब्द भाजपने दिला होता. शिवसंग्राम वगळता इतर पक्षांना
मंत्रीपदे मिळाली. तेव्हा मेटेंना मंत्रीपद कधी देणार या प्रश्‍नावर
मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुराईने "मेटेंना आम्ही अरबी समुद्रातील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारक समितीचे अध्यक्षपद दिले आहे, ते कुठल्याही मंत्रीपदापेक्षा मोठे' असल्याचे सांगत हा विषय खुबीने टाळला होता. तत्पुर्वी मेटे यांनी मंत्रीपदासाठी डेडलाईन, निर्वाणीचे इशारे आणि डेडलाईनला मुदतवाढ देऊनही पाहिले पण त्याकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्षच केले.
 

 

संबंधित लेख