lonikar and bjp party | Sarkarnama

लोणीकर पिता-पुत्रांची जुळवा जुळव सुरू, वारकरी सेनेचे "वाघ' भाजपमध्ये

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

घनसावंगी : प्रबोधन सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रमेश महाराज वाघ यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, जालन्याचे आमदार व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले रमेश महाराज वाघ भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

घनसावंगी : प्रबोधन सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रमेश महाराज वाघ यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, जालन्याचे आमदार व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले रमेश महाराज वाघ भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व त्यांचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेले पुत्र राहूल लोणीकर यांची ही निवडणूक पूर्व जुळवाजुळव असल्याची देखील चर्चा आहे. बबनराव लोणीकर यांनी रमेश महाराज वाघ यांना घेऊन बुधवारी (ता.12) थेट मुंबई गाठली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना भाजप प्रवेश देण्यात आला. वारकरी सेनेच्या माध्यमातून रमेश महाराज वाघ यांना केवळ जालना जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यातील अनेक भागात चांगला जनसंपर्क असल्याचे बोलले जाते. 

शिवसेनेत वारकरी सेनेचे काम करत असतांना त्यांनी वारकऱ्यांचे अनेक प्रश्‍न शासन दरबारी मांडले व ते सोडवून घेतले होते. शिवसेनेप्रमाणेच त्यांचे भाजपचे लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यांशीही चांगले संबंध होते. मुंडे यांच्या कन्या पंकजा यांच्यांशीही त्यांचा स्नेह आहे. याच कारणांमुळे रमेश वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. 

राहूल लोणीकर आगामी लोकसभा निवडणुक परभणीतून लढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. घनसांवगी विधानसभा मतदारसंघ परभणीमध्ये येत असल्याने रमेश महाराजांची मदत निवडुकीत होऊ शकते हा देखील त्यांच्या भाजपप्रवेशा मागचा हेतू असू शकतो. शिवाय बबनराव लोणीकर यांना देखील परतूर विधानसभा मतदारसंघात महाराजांच्या जनसंपर्काचा फायदा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. 

या दोन कारणांशिवाय रमेश महाराज वाघ हे स्वःत घनसांवगी विधानसभा मतदारसंघातून निवडूक लढवण्यास इच्छूक असल्याची जोरदार चर्चा आहे. कॉंग्रेसकडून पंचायत समिती निवडणूक हाच काय तो महारांजाचा राजकारणातील अनुभव. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांच्या सारख्या अनुभवी आणि मातब्बर नेत्याच्या विरोधात भाजप महाराजांना खरंच मैदानात उतरवणार का? हा खरा प्रश्‍न आहे. 

आता भाजपला रमेश महाराज वाघ यांचा आगामी निवडणुकीत किती फायदा होतो, भाजप त्यांना घनसावंगीतून उमेदवारी देणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेशी निष्ठा राखून असलेल्या रमेश महाराज यांना भाजपमध्ये घेत बनबराव लोणीकरांनी निवडणुकी आधीच जिल्ह्यात शिवसेनेला धक्का दिल्याचे दिसते. 

संबंधित लेख