lonar-mahadev-jankar-demands-reasonable-seat-sharing-with-bjp | Sarkarnama

`रासप'ला सन्मानजनक वाटा न मिळाल्यास ताकद दाखवू : महादेव जानकर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

``आज जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलो तरी येणाऱ्या काळात सन्मानजनक वाटा न मिळाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष ताकद दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,'' असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिला. 

लोणार : ``आज जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलो तरी येणाऱ्या काळात सन्मानजनक वाटा न मिळाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष ताकद दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,'' असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिला. 

राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आज केंद्र आणि राज्यात सत्तेत पोहोचला आहे. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, परभणी, हिंगोली, ईशान्य मुंबई या मतदारसंघात तर राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. येणारा काळ हा राष्ट्रीय समाज पक्षाच असेल असेही जानकर यावेळी म्हणाले. 

बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता महादेव जानकर यांनी लोणार येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत, प्रदेश सदस्य रमेश थोरात, गजानन मोरे, ज्ञानेश्‍वर गिलवलकर, युवाजिल्हा अध्यक्ष अमोल काकड, जिल्हा संपर्क प्रमुख सुनील मतकर, ज्येष्ठ नेते रामदास गुरव, सिद्धार्थ पैठणे, प्रतिभा डोंगरे, योगेश मिसाळ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री. जानकर म्हणाले, की राज्यात 10 लोकसभा व 288 विधानसभा मतदारसंघात रासप निवडणुकीची चाचपणी करीत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना दिवंगत कांशीरामजी यांच्या विचाराने प्रेरित होऊन केलेली आहे. 

देशातील उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी बसविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच लावलेले छोटे रोपटे आज हळूहळू वटवृक्षात रूपांतरीत होत आहे. गावागावात सर्व जाती-धर्माचे लोक पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात दाखल होत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष हा बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. यापक्षात सर्वसामान्य माणसाला न्याय दिला जातो. जो पक्षासाठी मेहनत करेल, बूथ करेल अशाच व्यक्तीला पक्षात पदे दिल्या जातात. आगामी निवडणुकीत पक्षाला सन्मानजनक वाटा मिळेल अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास रासप आपली ताकद दाखवून देईल, असे महादेव जानकर म्हणाले. 

भाजपला केंद्र आणि राज्यात सत्तेत बसविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षा बरोबर धनगर समाजाचा सिंहाचा वाटा आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यासोबतच मराठा व मुस्लिम समाजाला देखील आरक्षण द्यावे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जानकर यांनी दिली. 

संबंधित लेख