लोकसभेसाठी औरंगाबाद- जालन्यात खैरे -दानवेंना राष्ट्रवादीचे आव्हान ?

2019 मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्येच अद्याप आघाडी बाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
Aurangabad-Jalna-loksabha
Aurangabad-Jalna-loksabha

औरंगाबादः आगामी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना हे दोन लोकसभेचे मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडावे यासाठी पदाधिकारी आग्रही असल्याचे समजते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी वाटाघाटी सुरू आहेत.  50-50 चा फॉर्म्युला असावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे, पण कॉंग्रेस त्यावर अनुकूल नसल्याचे दिसते. 

 मराठवाड्यातील ज्या लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस सातत्याने पराभूत होत आली आहे, त्या जागा राष्ट्रवादीसाठी सोडाव्यात असा मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना लोकसभेची जागा आम्हाला द्या अशा धोशा राष्ट्रवादीने आपल्या नेत्याकंडे लावल्याची चर्चा आहे. 

औरंगाबादेतून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि जालन्यातून भाजपचे रावसाहेब दानवे सलग चारवेळा लोकसभेला निवडून आलेले आहेत . त्यांना आव्हान देऊ शकतील असे उमेदवार म्हणून आमदार सतीश चव्हाण आणि आमदार राजेश टोपे यांची नावे अन्य नावाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चर्चेत आहेत . 

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरु केले आहेत. पण कॉंग्रेसला एमआयएम नको, तर वंचित बहुजनला राष्ट्रवादी नको असे त्रांगडे निर्माण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्याची चर्चा काही पुढे सरकत नाही. यातच मराठवाडा व राज्यातील बऱ्याच मतदारसंघात अदला-बदल करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर दोन्ही पक्षाकडून केली जात आहे. 

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी औरंगाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड व जालना या पाच जागा कॉंग्रेसने लढवल्या होत्या. तर बीड, उस्मानाबाद आणि परभणी या तीन जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. नांदेड, हिंगोली वगळता कॉंग्रेसला इतर तीन मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस तीनही मतदारसंघात पराभूत झाली होती. शिवसेनेने परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि भाजप लातूर, बीड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 

जालना, औरंगाबाद या दोन लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस वीस वर्षापासून सातत्याने पराभूत होत आली आहे. या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही जागा आपल्या वाट्याला याव्यात असे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील अशी चर्चा सुरू असल्याचे औरंगाबाद येथील दुष्काळ चिंतन बैठकीच्या वेळी सांगितले होते. पंरतु या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही हे सांगायला देखील ते विसरले नाहीत. 

औरंगाबाद आणि जालना हे मराठवाड्यातील दोन महत्वाचे जिल्हे आहेत. जालना स्टील व बियाणे उद्योगासाठी प्रसिध्द तर औरंगाबाद ऐतिहासिक आणि झपाट्याने औद्योगिक क्षेत्रात विकास करणारे शहर. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघावर आपली पकड कायम राहावी असा प्रयत्न कॉंग्रेसकडून केले जाणार. औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेस सध्या ज्या पध्दतीने कामाला लागली आहे ते पाहता कॉंग्रेस ही जागा सोडेल अशी शक्‍यता कमीच वाटते. 

त्या तुलनेत जालन्यात कॉंग्रेसची ताकद कमी दिसते. शहरात कैलास गोरंट्याल आणि परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी नगरपालिका आपल्या ताब्यात राखत काही प्रमाणात कॉंग्रेसची ताकद दाखवून दिली होती. जिल्ह्याच्या इतर भागात मात्र कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा जोर अधिक दिसतो. माजी मंत्री व घनसांवगीचे आमदार राजेश टोपे यांनी साखर उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मोठी शक्ती उभी केल्याचे बोलले जाते. 

त्यामुळे केवळ सातत्याने पराभव पदरी पडतोय या सबबीवर कॉग्रेस या दोन जागा राष्ट्रवादीला सोडणार का हाच खरा प्रश्‍न आहे. मराठवाड्यातील इतर सहा मतदारसंघाचे वाटप पुर्वी प्रमाणेच होण्याची शक्‍यता आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com