लोकसभा व विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात एकत्रित होणे शक्य : खडसे 

लोकसभा व विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात एकत्रित होणे शक्य : खडसे 

धुळे : लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होतील, याविषयी संभ्रमाची स्थिती असली तरी महाराष्ट्रासंदर्भात तसा निर्णय होऊ शकतो, असा अंदाज  भाजपचे ज्येष्ठ  नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.  युती न करण्याबाबत शिवसेना टोकाची भूमिका घेणार नाही, असे वाटते. मात्र, त्या विषयी आताच काही ठामपणे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

खडसे यांनी विविध विषयावर `सरकारनामा`शी संवाद साधला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना बराच अवकाश आहे. तोपर्यंत भाजप- शिवसेनेची युती होते किंवा नाही, या निवडणुका एकत्रितपणे होणार की नाहीत याविषयी रंगतदार चर्चा आणि करमणूकही चालेल. 

सत्ता दुसऱ्याला द्यायची का? 

"डरकाळी' फोडत मुंबई, कल्याण- डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने सत्ता मिळविली म्हणून भाजपप्रणीत सरकार चालत नाही, असे थोडेच आहे. पक्षांत आपापसांत मतभेद असतात. पण अंतिमतः आपल्या हाती असलेली सत्ता दुसऱ्याला म्हणजे कॉंग्रेसला देऊन टाकायची का? असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला विचारला. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तुल्यबळ ठरेल किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही. रात्रीतून रोज समीकरणे बदलत असतात. 


प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते... 

चाळीस वर्षांच्या राजकारणात प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन वेळा "ऑफर' आली. मात्र, व्यक्तिगत कारणांमुळे "ऑफर' स्वीकारली नाही. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष झाले होते. यात नेते नितीन गडकरी ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा होती. त्यासाठी तारीख, जळगावला सभा घेऊन नेते लालकृष्ण अडवानी यांच्या उपस्थितीत माझ्या नावाची घोषणा करायची, असे निश्चित झाले. मात्र, गडकरींचे नाव घोषित झाले. त्याविषयी नाराजी न ठेवता पक्षाचे काम करत राहिलो. 

गद्दारी न करताही शिक्षा 

मी पक्षाशी कधीही गद्दारी, बेईमानी, बदमाशी केलेली नाही, भ्रष्टाचार वा कुठला गुन्हा केलेला नाही, हेतुपुरस्सर झालेल्या विविध राजकीय आरोपांवर चौकशी झाली, त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही, तरीही मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतो आहे. त्यामागची कारणे जनतेला माहीत आहे, मला ती माहीत नाही, असे काहीसे नाराजीच्या सुरात सांगत श्री. खडसे यांनी प्रश्नाला बगल दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com