कोरेगावात विजयस्तंभाला अभिवादनासाठी येणाऱ्यांचे स्थानिकांनी केले स्वागत

कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षी झालेल्या तणावाच्या जखमा भरून आल्या आहेत. एक जानेवारीच्या विजयदिनासाठीराज्यभरातून येणाऱ्या भीमसैनिकांच्या स्वागतासाठी स्थानिक सज्ज झालेले आहेत.
कोरेगावात विजयस्तंभाला अभिवादनासाठी येणाऱ्यांचे स्थानिकांनी केले स्वागत

कोरेगाव भीमा : पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सोमवारपासून राज्याच्या विविध भागांतून समाजबांधव येण्यास सुरवात झाली होती. स्थानिकांकडून त्यांचे फूल व पाणी देऊन स्वागत करण्यात आले. 

दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज विजयस्तंभ परिसराला भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. 

पोलिसांसह सर्वच यंत्रणांनी सेवा-सुविधांची अंमलबजावणी सुरू केली. यात पार्किंग, वीज, पाणी, खाद्यपदार्थ, आरोग्य, अग्निशमन यांसह विजयस्तंभस्थळी आत-बाहेर येण्याचे मार्ग, तसेच सजावट यांचाही समावेश होता. 

आज सकाळी परेड 

अभिवादन कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी महार बटालियन व समता सैन्य दलाची परेड होईल. त्यानंतर दिवसभर अभिवादनाचा कार्यक्रम, विविध मान्यवरांचे आगमन व सभा होतील, अशी माहिती विजयरणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी दिली. 

स्वागतासाठी स्थानिकांचा पुढाकार 
पेरणे येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व व्यापारी संघटन आदींच्या वतीने, तर कोरेगावात ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच शिवसेनेसह विविध पदाधिकाऱ्यांनी, तसेच लोणीकंद व अष्टापूर फाटा येथे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व स्थानिकांनी समाजबांधवांचे स्वागत केले. 

दुपारी सभा 
अभिवादनासाठी राज्यातील अनेक नेते येत असून, निवडक पक्ष-संघटनांच्या सभांना पोलिस प्रशासनाने परवानगी दिली आहे. यात रिपब्लिकन सेनेची सभा विजयस्तंभाजवळ, तर उर्वरित सभा टोलनाक्‍याजवळ होणार असल्याचे आयोजक व कार्यकर्त्यांनी सांगितले. 

पोलिसांचे संचलन 
विजयस्तंभ परिसरासह कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसर व वढू, तुळापूर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी पोलिसांचे संचलनही झाले. पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. कर्मचाऱ्यांच्या निवासव्यवस्थेचीही विचारपूस केली. बंदोबस्तावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवास व भोजन व्यवस्थेसाठी परिसरातील शाळा, गोदाम, तसेच हॉटेल्सची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. 

कार्डियाक सुविधेसह 14 रुग्णवाहिका 
पेरणे ग्रामपंचायतीने विजयस्तंभाजवळ स्वागत, तर जिल्हा आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवेसाठी कक्ष उभारण्यात आला आहे. कार्डियाक सुविधेसह 14 रुग्णवाहिकेसहित आरोग्य पथक तैनात करण्यात आल्याचे डॉ. दिलीप माने, तसेच सरपंच रूपेश ठोंबरे व उपसरपंच अनिता सात्रस यांनी सांगितले. 

ड्रोन कॅमेरे कार्यान्वित 
विजयस्तंभस्थळी सोमवारी सायंकाळी फुलांच्या सजावटीचे काम सुरू होते. थेट प्रक्षेपणासाठी वृत्तवाहिन्यांच्या ओबीव्हॅन दाखल झाल्या होत्या. परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरेही कार्यान्वित करण्यात आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com