Loan Waiver Scheme Name Swabhimani Sanghatna | Sarkarnama

कर्जमाफीच्या योजनेच्या नावावरुन 'स्वाभिमानी'त दोन मते?

ब्रह्मा चट्टे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

अटी आणि शर्तीमध्ये अडकलेल्या शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे नाव बदलण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अधिकृत लेटहेडवर करण्यात आली आहे. आकडेवारीच्या गोंधळात अडकलेल्या सरकारला आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेरण्यास सुरवात केली आहे. मात्र नांव बदलण्याच्या या मागणीची कल्पना स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई : अटी आणि शर्तीमध्ये अडकलेल्या शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे नाव बदलण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अधिकृत लेटहेडवर करण्यात आली आहे. आकडेवारीच्या गोंधळात अडकलेल्या सरकारला आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेरण्यास सुरवात केली आहे. मात्र नांव बदलण्याच्या या मागणीची कल्पना स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना नसल्याचे समोर आले आहे.

'राज्य सरकारची कर्जमाफीची योजना फसली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करू नये' अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावे नांदेड जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी लिहिले आहे. ''राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेस 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' असे नाव देण्यात आले आहे.  मात्र, या योजनेतून एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नसून या योजनेबाबत रोज नकारात्मक बाबी घडत आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे या योजनेची टिंगल टवाळी केली जात आहे. या योजनेला असलेल्या शिवाजी महाराजांच्या नावामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या जात आहेत. त्यामुळे एकतर सरकारने या योजनेचे नाव बदलावे किंवा सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,'' असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी पत्रातून दिला आहे.

याबाबत स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले, "ही इंगोलो यांची व्यक्तीक भूमिका आहे. कर्जमाफीच्या गोंधळामुळे शिवाजी महाराजांचा अवमान होतो ही माझीही भावना आहे. मात्र, नाव बदल्याची मागणीही इंगोले यांची व्यक्तीगत आहे. त्याचा संघटनेशी काहीही संबंध नाही.''

स्वाभिमानीच्या लेटर हेडवरून इंगोले यांनी लिहिलेले पत्र -

महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही पुर्णतः फसवी योजना असून या योजने विषयी सर्वत्र टिंगल टवाळी होत असून खंडीभर निकष असेल्या कर्जमाफी योजनेचा विषय जरी निघाला तरी सर्वत्र शासनाच्या नाकर्तेपणाची, मुर्खपणाची चेष्टा होत आहे. त्यामुळे आपण सुरू केलेल्या या योजनेमुळे शेतकर्‍यांची घोर निराशा झाली व फसव्या योजनेला छत्रपतींचे नावे दिल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखावत आहेत. त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की,आपण एक तर शेतकर्‍यांना पुर्णतः सरसकट कर्जमुक्ती देवून छत्रपतींच्या दिलेले नाव सार्थ ठरवावे किंवा शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या व शासनाची निंदा नालस्ती होणार्‍या या योजनेला दिलेले छत्रपतींचे नाव बदलावे. अन्यथा येणार्‍या काळात शेतकरी आपल्या सरकारला माफ करणार नाही. आपण जर या योजनेचे नाव बदलले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. दरम्यान होणार्‍या सर्व प्रकाराला सरकार जवाबदार राहील याची नोंद घ्यावी.

आपला.

प्रल्हाद रामजी इंगोले

जिल्हाध्यक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटना,नांदेड

संबंधित लेख