Loan waiver in Maharashtra | Sarkarnama

'मुदतपूर्व'च्या बेगमीसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नवा डाव

ब्रह्मदेव चट्टे
सोमवार, 5 जून 2017

कर्जमाफी केल्यास त्याचे श्रेय विरोधकांच्या आंदोलनाला न जाता थेट भाजपला मिळेल असे या पक्षातील धुरीणांना वाटते. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करण्याची तयारी दाखवली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाला थांबण्यासाठी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा लाभ 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे भाजपच्या चाणक्यांनी हेरले आहे.

मुंबई- राज्यात सततची आंदोलने आणि मित्र पक्ष शिवसेनेच्या 'ब्लँकमेलिंग'ला कंटाळून भाजप लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे समजते. राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी मान्य करत भाजप मुदतपूर्व निवडणुकांच्या बेगमीसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा डाव टाकणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. त्यामुळे येत्या डिसेंबरमध्ये राज्यात विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असल्याचा दावाही सुत्रांनी केला.

संपासाठी वातावरण निर्मिती करणारे जयाजी सुर्यवंशी व धनंजय जाधव हे दोघेही भाजपशी संबंधीत होते. त्यांच्या मार्फत संपाचे वातावरण तयार करत आणि मग संप मागे घेत त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांच्या पदरात जाईल अशी रणनिती पहिल्या टप्प्यात अवलंबण्यात आली. ती बऱ्या पैकी यशस्वी झाली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात शेतकरी अंदोलनाची सुत्रे विरोधकांकडे जाणार नाहीत, याची काळजीही सरकारच्या वतीने घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुखद धक्का देत कर्जमाफी करून मध्यावधीला समोरे जायचे अशी रणनिती आखण्यात आली आहे.

कर्जमाफी केल्यास त्याचे श्रेय विरोधकांच्या आंदोलनाला न जाता थेट भाजपला मिळेल असे या पक्षातील धुरीणांना वाटते. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करण्याची तयारी दाखवली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाला थांबण्यासाठी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा लाभ 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे भाजपच्या चाणक्यांनी हेरले आहे. 2019 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी ताणणे शक्य नसल्याने कर्जमाफी करत मुदतपूर्व निवडणुकांचा पर्याय गंभीरपणे पडताळण्यात येत आहे.

मुदतपूर्व निवडणुका घेतल्यास भाजपला किती फायदा होणार यासाठी खासगी लोकांच्या माध्यमांतून सर्वेक्षणही करण्यात आल्याचे समजते. या सर्वेक्षणानुसार भाजपला 200 च्या वर जागा मिळत स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अहवाल ही विविध यंत्रणांकडून प्राप्त झाल्याचे समजते. त्यामुळे भाजप मोठा निर्णय घेत मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करत निवडणुका घेण्याची शक्यता असून या निवडणुकीसाठी 'माझा शब्दा आहे' अशी 'स्लोगन'ही तयार करण्यात आल्याचे समजते. भाजपचा वाढता जनाधार 'कॅश' करण्यासाठी व एकहाती सत्ता मिळवण्यासाठी मुदतपूर्व निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या  हालचाली पक्षाच्या पातळीवर सुरू असल्याची माहितीही सुत्रांनी दिली.

मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाताना सिंचन घोटाळ्यातील आरोपींवर काय कारवाई केली, हा प्रश्न विचारला जाणार आहे. याला ठोस उत्तर देण्यासाठी सध्या तरी समाधानकार उत्तर भाजपकडे नाही. त्यामुळेच अजित पवारांना विविध भ्रष्टाचारात गोवण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात आहे.

संबंधित लेख