letter to dear awani | Sarkarnama

प्रिय अवनी .....

गोपाळ कुळकर्णी
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

प्रिय अवनी 

वाघानं वाघासारखं जगलेलं "माणसा'ला देखवत नाही कारण माणसाला "माणसा'च्या जगात "वाघ' व्हायचं असतं. हा त्याचा अहंकार असतो, दुसऱ्याला तुच्छ लेखण्यासाठी त्यानं निवडलेलं ते एक सोयीचं प्रतिक असतं. आम्ही माणसं हल्ली प्रतिकांच्या व्हर्च्युल जगात भलतेच तरंगत आहोत.

प्रिय अवनी 

वाघानं वाघासारखं जगलेलं "माणसा'ला देखवत नाही कारण माणसाला "माणसा'च्या जगात "वाघ' व्हायचं असतं. हा त्याचा अहंकार असतो, दुसऱ्याला तुच्छ लेखण्यासाठी त्यानं निवडलेलं ते एक सोयीचं प्रतिक असतं. आम्ही माणसं हल्ली प्रतिकांच्या व्हर्च्युल जगात भलतेच तरंगत आहोत.

आम्हाला "वाघ' हवाय पण तो डेस्कटॉप, मोबाईलच्या वॉलपेपरवर किंवा कुठल्यातरी प्राणीसंग्रहालयात अथवा आम्ही ठरवलेल्या अभयारण्यात. आम्हाला वाघ हवाय, जेथे आम्ही विचारशक्ती गहाण टाकतो अशा कुठल्यातरी पक्षाच्या बॅनरवर. अवनी, त्या पक्षाचा नेता माणसातला वाघ म्हणून वावरत असतो. खरंतर त्यातील अनेकजण नरभक्षकच असतात, कारण ते सत्तेसाठी माणसं झुंजवतात आणि माणसांकरवीच त्यांची शिकारही घडवून आणतात. त्यांच्यासाठी कायदा "जंगल के कानून'सारखा सर्वांसाठी समान नसतो.

येथे माणसांपरत्वे कायदा बदलतो. खरंतर व्याघ्र कुळाचा संहार करतच आमच्या पुर्वजांनी त्यांचं पौरूषत्व सिद्ध केलंय. आताही काहींना पौरूषत्व जागविण्यासाठी वाघांच्याच नखांचा, हाडाचा, रक्ताचा आधार घ्यावा लागतो. कारण जंगलाच्या बाहेर नामर्दाच्या फौजा उदंड जाहल्यात. ते कारण नसताना तुमच्या घरात गाड्या घेऊन घुसतात. सेल्फी काढतात. तो कॅमेऱ्याचा क्‍लिकाट खरंच किती डिस्टर्बिंग असतो नाही? पण आम्हाला वाघ जसा पिंजऱ्यात कोंडायला आवडतो तसाच तो कॅमेऱ्यात बळजबरीने कोंबावासा वाटतो. ज्या प्राणीसंग्रहालयात आम्ही व्याघ्र कुळाची स्मारकं उभारली ती तरी वाघांना साजेशी कुठे असतात. हा जन्माचा कोंडवाडा भोगत व्याघ्र कुळातील अनेक पिढ्या नामशेष होतात.

अवनी तू माणसांची शिकार करून मोठी चूक केलीस, कारण अगं वेडे माणसाचं रक्त अन्य प्राण्यासारखं निष्पाप नसतं गं. ते कोकेनसारखं नशिलं आणि दगाबाज असतं. एकदा इनफेक्‍शन झालं की पायापासून डोक्‍यातील मेंदूपर्यंत सगळं करप्ट होतं. पुन्हा त्याचीच चटक लागते. हा दोष तुझा नाही तो रक्ताचा आणि माणसाच्या "डीएनए'चा आहे. कारण आम्ही आमची घरं बांधताना तुमची घरं कधी बळकावून बसलो हे समजलंच नाही. तेराजणांना मारल्याने आम्ही तुला गोळ्या घातल्या पण आतापर्यंत आम्ही आमच्याच स्वार्थासाठी किती वाघांचा बळी घेतला याची मोजदाद नाही. कपाळकरंटे मनुष्यमात्र आता निसर्गाचीच अन्नसाखळी तोडून स्वत:च्याच ताटात माती कालवताहेत.

आता तुझ्या पश्‍चात तुझ्या पिलांचे काय होणार, असा प्रश्‍न नक्कीच तुला पडला असेल, ते आता काय खातील, त्यांना कोण सांभाळेल आणि आईच्या खुनाने पिसाट झालेली ती बाळं पुढे नरभक्षक तर होणार नाहीत ना? अशा मातृसुलभ शंका नक्कीच तुझ्या डोक्‍यात काहूर माजवत असतील. माफ कर आता खोटं बोलवत नाही म्हणून तुला सांगायलाच हवं. ते नरभक्षक झाले तर त्यांनाही गोळ्या घातल्या जातील, जगलेच तर ते जंगलातील किंवा प्राणीसंग्रहालयातील शोपीस म्हणून वाढतील.

जगतील काही तरी छोटीमोठी शिकार करून. काय सांगता कदाचित कुणी तरी त्यांचीही शिकार करेल. माणसाचं जग हे असं बेभरवाशाचं आहे बाई. तुम्ही करता ती खुलेआम शिकार असते माणसं करतात ती चोरटी तस्करी असते. जमलंच तर माफ कर, अन्‌ तुझ्या त्या पिलांना स्वप्नात येऊन सांग की, माणसांच्या जहरी रक्तीला कधीच तोंड लावू नका म्हणून..! 
..... 
तुझ्याच पट्टेरी प्रेमात पडलेला एक व्याघ्रप्रेमी

संबंधित लेख