leaders left satej patil group | Sarkarnama

सतेज पाटील गटाला खिंडार; चंद्रकांतदादांचा दणका! 

निवास चौगले 
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या मूळ गावात त्यांच्याच गटाला खिंडार पाडण्यात आज भाजपा नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना यश आले. सतेज पाटील यांचे नेतृत्त्व मानणारे कसबा बावडा परिसरातील दोन तर त्यांच्या विधानसभा मतदार संघातील एक अशा तीन महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला. 

कोल्हापूर : माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या मूळ गावात त्यांच्याच गटाला खिंडार पाडण्यात आज भाजपा नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना यश आले. सतेज पाटील यांचे नेतृत्त्व मानणारे कसबा बावडा परिसरातील दोन तर त्यांच्या विधानसभा मतदार संघातील एक अशा तीन महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला. 

माजी उपमहापौर मोहन गोंजारे, माजी गट नेते चंद्रकांत घाटगे व माजी नगरसेवक प्रदीप उलपे अशी भाजपात प्रवेश केलेल्या सतेज समर्थकांची नांवे आहेत. या तिघांचा भाजपा प्रवेश म्हणजे श्री. पाटील यांच्या कसबा बावडा येथील गटालाच मोठा धक्का समजला जातो. श्री. पाटील हे परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांची याबाबतची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 
महापालिकेच्या 2010-15 च्या सभागृहात श्री. गोंजारे, घाटगे व उलपे नगरसेवक होते. निवडणुकीनंतरच पहिल्या उपमहापौर पदाचा मान श्री. गोंजारे यांना दिला होता. श्री. गोंजारे यांचा प्रभाग हा श्री. पाटील यांनी प्रतिनिधीत्त्व केलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात येतो. 2004 च्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत श्री. पाटील यांनी ज्यांचा पराभव केला त्या कै. दिग्विजय खानविलकर यांचे खंदे समर्थक अशी श्री. घाटगे यांची ओळख होती. पण तरीही श्री. पाटील यांनी त्यांना लाईन बाजार प्रभागातून उमेदवारी देऊन निवडून आणले. ही उमेदवारी देताना श्री. पाटील यांनी अनेक जवळच्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली होती. प्रदीप उलपे हे 2010 ला कसबा बावडा येथील उलपे मळा प्रभागातून विजयी झाले होते. त्यांना पाच वर्षात पद दिले नाही पण 2015 ला त्यांनी एका प्रभागातून उमेदवारी मागितली होती, पण ती न दिल्याने तेव्हापासून ते श्री. पाटील यांच्यापासून दूर होते. आज या तिघांनीही ताराबाई पार्कातील एका हॉलमध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात आयोजित भाजपाच्या बैठकीत पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत गळ्यात भाजपाचे कमळ असलेल्या स्कार्प घालून भाजप प्रवेश केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख