leader of opposition Radhakrishna Vikhe Patil on farmers' loan waiver | Sarkarnama

कर्जमाफी योजना फसली, निम्म्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नाही - राधाकृष्ण विखे पाटील

सरकारनामा न्यूज ब्यूरो
बुधवार, 7 मार्च 2018

मुख्यमंत्र्यांनी २४ जूनला ३४ हजार कोटींची, ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी आणि ४० लाख शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणारी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतु, सरकारचीच आकडेवारी गृहित धरली तरी कर्जमाफी योजना फसली, निम्म्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

मुंबई  : मुख्यमंत्र्यांनी २४ जूनला ३४ हजार कोटींची, ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी आणि ४० लाख शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणारी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतु, सरकारचीच आकडेवारी गृहित धरली तरी कर्जमाफी योजना फसली, निम्म्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

नियम २९३ अन्वये विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, गारपीटग्रस्तांसाठी सरकारने एसडीआरएफमधून ३१३ कोटी ५८ लाख ६३ हजार रूपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, या रक्कमेतून एका एकराला फक्त ४ हजार ३२६ रूपये ९१ पैसे मिळणार आहे. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असून, गारपीटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी.

 २२ डिसेंबर २०१७ रोजी कृषिमंत्र्यांनी बोंडअळी आणि मावा व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची घोषणा केली. परंतु, अडीच महिन्यानंतर केवळ एक प्रशासकीय आदेश काढण्यापलिकडे या सरकारला काहीही करता आलेले नाही. या आदेशात फक्त प्रशासकीय मान्यता आहे, सरकारने निधीची तरतूद केलेली नसल्याचे विखे पाटील यांनी निदर्शनात आणून दिले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, " आपल्या मूळ घोषणेत कृषिमंत्र्यांनी कोरडवाहू कापूस उत्पादकांना हेक्टरी ३० हजार ८०० रूपये तर बागायती क्षेत्रातील कापूस उत्पादकांना ३७ हजार ५०० रूपये हेक्टरी मदत देण्याचे जाहीर केले होते. कोरडवाहू धान उत्पादकांना हेक्टरी ७ हजार ९७० तर बागायती धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १४ हजार ६७० रूपये देण्याचे सांगण्यात आले होते.

सरकारने या मदतीमध्ये नमूद केलेली पिक विम्याची रक्कम आणि कंपन्यांकडून मिळणाऱ्या भरपाईचे भवितव्य अधांतरी असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन खोटे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारने कुठून पैसा आणणार याच्याशी शेतकऱ्यांना काहीही घेणे देणे नाही. सरकारने कुठूनही पैसा उभा करावा. पण शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे. अन्यथा विरोधी पक्षांना हक्कभंग दाखल करावा लागेल, असा इशाराही विखे पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.

संबंधित लेख