मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाही आमदार पवार मेटें सोबतच, पंकजाताई काय म्हणतील ? 

गेल्या आठवड्यात भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांना घरी बोलावून सत्कार केला होता. त्या दोघांत बंद खोलीत झालेल्या खलबतांची चर्चा थांबलेली नसतानाच आता देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरही हे दोघे सोबत होते.
mete-Pawar-CM
mete-Pawar-CM

बीड : भाजप  आमदार लक्षण पवार  यांनी  विनायक मेटे यांना  घरी बोलावून  त्यांचा सत्कार केला .  बंद दाराआड त्यांच्याशी चर्चा केली . यामुळे उठलेला धुराळा खाली बसण्याआधीच बुधवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानीही पवार व मेटे पुन्हा सोबत दिसले. या घटनेचे पडसाद येत्या काही दिवसात बीड जिल्ह्यात उमटतील असे दिसते . 

त्यामुळे पवार - मेटे असे काही नवे समीकरण जुळून जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यात नवा 'संग्राम' तर होणार नाही ना अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

भाजप  आमदार लक्षण पवार यांना सक्षम राजकीय वारसा आहे. त्यांचे दिवंगत आजोबा शाहूराव पवार आणि दिवंगत वडील माधवराव पवार या दोघांनीही गेवराईची आमदारकी भूषवलेली आहे. मात्र, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या घरात सोयरीक झाल्यानंतर विधानसभा पंडितांकडे आणि गेवराई नगरपालिका पवारांकडे असा अलिखित राजकीय समझोताच झाला. त्यानुसार पवारांनी गेवराई पालिकेवर वर्चस्व मिळवत स्वतः नगराध्यक्षपदही भूषविले. 

मात्र, मागच्यावेळी हा अलिखित करार मोडून लक्ष्मण पवार यांनी 'गेवराईत पंडीतमुक्त ' करण्याचा नारा दिला आणि विधानसभा लढविली. त्यांच्या नाऱ्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला  आणि जिल्ह्यात सर्वाधिक 61 हजार मतांनी विजय मिळविण्याचा विक्रम लक्षण पवारांनी केला. मात्र, त्यानंतर ते आणि नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नेहमीच अंतर दिसले. मुंडेंच्या गेवराई मतदार संघ वगळता इतर कार्यक्रमांना लक्षण पवार फारसे नसत. विकास कामांच्या निधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस वा इतर नेत्यांना भेटायला जाताना ते एकटेच जात. 

गेवराईतही भाजप ऐवजी लक्षण सेनेच्या शाखा वाढू लागल्या. गेवराईच्या राजकारणात महत्वाचे मुद्दे असलेले वाळू, राशन आणि रस्ते हे विषय त्यांनी अजेंड्यावर घेतल्याने समर्थकांनी त्यांना 'कार्यसम्राट' ही उपाधी देऊन टाकली. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांनाही मग बदमराव पंडित यांना झुकते माप द्यायला सुरुवात करून पवारांना अप्रत्यक्ष इशारा देऊन टाकला. मात्र, पवारांनीही मुंडेंचे कट्टर विरोधक विनायक मेटे यांच्याशी जवळीक वाढविली. 

 अगोदर मेटेंच्या ऊसतोड कामगार मेळाव्याला मदत केल्यानंतर गेल्या आठवड्यात घरी बोलावून विनायक मेटे यांचा सत्कार केला. या दोघांत पाऊण तास बंद दाराआड चर्चाही झाली. या सत्कार आणि बंद दाराआड झालेल्या चर्चेची चर्चा थांबलेली नसताना आता पवारांनी नवाच धमाका केला आहे.

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी लक्षण पवार यांनी विनायक मेटे यांच्या सोबत दिसले.  नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवाद करतेवेळी हे सर्वजण एकत्रच होते. यानंतर त्यांच्यात काही चर्चाही झालेली असू शकते. एकूणच हे दोघे मिळून काही नवा राजकीय संग्राम करण्याच्या तयारीत तर नाहीत ना अशीही अटकळ बांधली जात आहे.

विनायक मेटे आणि लक्ष्मण पवार यांच्यातील वाढत्या भेटींवर पंकजा मुंडे आता काय पवित्रा घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com